दारू प्यायला पैसे नकारल्याने नवऱ्याकडून बायकोच्या डोक्यात हातोडीने वार करत हत्या

Spread the love

दारू प्यायला पैसे नकारल्याने नवऱ्याकडून बायकोच्या डोक्यात हातोडीने वार करत हत्या

योगेश पांडे / वार्ताहर

नाशिक – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडीचे घाव घालून ठार मारल्याची घटना सिन्नर तालुक्यातील निमगाव सिन्नर येथे मंगळवारी संध्याकाळी घडली. या घटनेत नंदा किरण सानप (३४) या विवाहितेचा मृत्यू झाला. याप्रकरणी घटनेनंतर फरार झालेला संशयित किरण विष्णू सानप (३८) यास मुसळगाव एमआयडीसी पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेत अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निमगाव-सिन्नरच्या टेकाडे वस्ती शिवारात राहणारे किरण विष्णू सानप आणि पत्नी नंदा किरण सानप यांच्यात नेहमीच खटके उडत होते. मंगळवारी किरण सानप याने पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, तिने ते देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर तो तिथून गावात आला.

संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तो घरी न आल्याने त्याची आई आणि मुलाने त्याचा गावात शोध घेतला. आई आणि मुलाला पाहताच त्याने आपल्या टेकाडे मळ्यातील वस्तीवर धूम ठोकली. दारूच्या नशेत असलेल्या किरण सानप याने घरामागे शेतात काम करत असलेल्या पत्नीशी हुज्जत घातली आणि तेथेच हातात असलेल्या हातोडीने त्याने तिच्या डोक्यात वार केले. छोटा मुलगा सार्थक हा घटनास्थळी आल्यानंतर त्याने आजूबाजूच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने जखमी अवस्थेतील नंदाला उपचारासाठी प्रारंभी सिन्नरला आणि त्यानंतर नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास उपचारा दरम्यान नंदाची प्राणज्योत मालवली. दरम्यान, नाशिक येथील मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या माहितीनंतर मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्यासह एका टीमने निमगाव सिन्नरला तर दुसऱ्या टीमने नाशिक येथे खाजगी रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेत पंचनामा केला. दरम्यान, शवविच्छेदनानंतर मयत महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताचे वडील बबन गोपाळा साबळे (६६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण सानप याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक कांतीलाल पाटील, पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon