प्रलंबित बिलांसाठी कंत्राटदार रस्त्यावर! ३५ जिल्ह्यांमध्ये मंगळवारी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – शासकीय विभागाच्या कंत्राटदारांची प्रलंबित देयके न मिळाल्याने हतबल झालेल्या कंत्राटदारांनी अखेर रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.१९ ऑगस्टला कंत्राटदारांनी राज्यव्यापी धरणे आंदोलनाची घोषणा केली आहे. ३५ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदार राज्य शासनाचा निषेध करणार आहेत. शासकीय विभागाच्या कंत्राटदारांची प्रलंबित देयके न मिळाल्याने कंत्राटदारांनी आता राज्य सरकारविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे.मंगळवारी १९ ऑगस्ट रोजी कंत्राटदारांनी राज्यव्यापी धरणे आंदोलन पुकारले आहे. काही दिवसांपूर्वी सांगलीत हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केल्याने प्रलंबित बिले हा विषय चांगलाच चर्चेत आला होता. विरोधकांनीही याविरोधात आवाज उठवत राज्य सरकारला धारेवर धरले होते.
मात्र राज्य सरकारकडून प्रलंबित बिले मिळत नसल्याने कंत्राटदारांनी आंदोलनाचा मार्ग पुकारला आहे. या आंदोलनाला – महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया, राज्य अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना, राज्य हॉट मिक्स असोसिएशन, राज्य मजूर सहकारी संस्था या संघटना पाठिंबा दर्शवला आहे.