घरांचा ताबा न देता दीड कोटींची फसवणूक; मोनार्च कंपनीवर गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई – वेगवेगळ्या गृहप्रकल्पांतून सहा घरे खरेदी करण्यासाठी तब्बल १ कोटी ४७ लाख रुपये देऊनही घरांचा ताबा न दिल्याप्रकरणी मोनार्च कंपनीतील तिघांवर सीबीडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने २०११ पासून आजपर्यंत घरांचा ताबा न मिळाल्याने अखेर न्यायालयीन दार ठोठावण्याआधी पोलिसांकडे धाव घेतली.
सीवूड परिसरात राहणारे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक सियाराम गर्ग यांनी २०११ मध्ये घर खरेदीसाठी मोनार्च कंपनीच्या सीबीडी कार्यालयाला भेट दिली. यावेळी गोपाळ ठाकूर, हसमुख ठाकूर आणि रामनिवास अग्रवाल यांनी त्यांना कंपनीच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. सहा घरे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर गर्ग यांनी टप्प्याटप्प्याने एकूण १ कोटी ४७ लाख रुपये भरले.
मात्र, एवढी मोठी रक्कम दिल्यानंतरही आजपर्यंत कोणत्याच घराचा ताबा देण्यात आलेला नाही. उलट कंपनीचे सीबीडीतील कार्यालय बंद आढळून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गर्ग यांनी सीबीडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिन्ही आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे घर खरेदीदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, अशा फसवणूक प्रकरणांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.