राहुल गांधींचा गंभीर आरोप : “भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून मतं चोरली!”

Spread the love

राहुल गांधींचा गंभीर आरोप : “भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून मतं चोरली!”

पोलीस महानगर नेटवर्क

नवी दिल्ली – विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज (दि. ७ ऑगस्ट) घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप आणि निवडणूक आयोगावर थेट मतचोरीचे गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी आरोप केला की, भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये संगनमत करून मतांचा गैरवापर केला असून, हे लोकशाही आणि भारतीय संविधानाच्या विरोधात घडलेलं मोठं षड्यंत्र आहे.

राहुल गांधी म्हणाले की, “निवडणूक आयोगाने काँग्रेस आणि इतर विरोधकांना कधीच मतदार यादीसंबंधित डिजिटल डेटा दिला नाही. मात्र आमच्याकडे काही ठोस पुरावे आहेत.” त्यांनी एका विशिष्ट व्यक्ती – आदित्य श्रीवास्तव याचा दाखला देत सांगितले की, ह्याच व्यक्तीने कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये मतदान केलं आहे. “आम्हाला आयोगाने डेटा दिला नाही, पण आम्ही आयोगाला ठोस पुरावे दिले,” असा घणाघातही राहुल गांधी यांनी केला.

मतांची चोरी म्हणजे लोकशाहीविरोधी गुन्हा – राहुल गांधी

“भाजपला अँटी-इनकम्बन्सीचा फटका का बसत नाही, हा प्रश्न कायमच राहिला आहे. देशात वातावरण विरोधात असताना सत्ताधारी पक्षाला लोकसभा निवडणुकीत फायदा आणि विधानसभा निवडणुकीत विरोधकांना नुकसान का होतं?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील सुसंगतीवर संशय व्यक्त केला.

त्यांनी महाराष्ट्राचा संदर्भ देताना सांगितले की, “लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विजय मिळतो आणि त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिला मोठा पराभव पत्करावा लागतो. एवढ्या कमी कालावधीत इतका मोठा जनमताचा बदल शक्य आहे का?”

पाच महिन्यांत एक कोटी नविन मतदार?

राहुल गांधींनी महाराष्ट्रातील मतदार यादीतील अचानक वाढीबद्दल आश्चर्य व्यक्त करत म्हटले की, “५ वर्षांत जेवढे मतदार वाढले नाहीत, ते ५ महिन्यांत वाढवण्यात आले. एवढेच नाही तर ही वाढ महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा जास्त असल्याचा दावा त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, “मतदार यादी देशाची मालमत्ता आहे. पण निवडणूक आयोग ती आमच्याकडे देण्यास नकार देतो. ज्या काही पक्षांना ती यादी दिली गेली, तीही अशा स्वरूपात होती की त्याचे विश्लेषण करता येणं अशक्य होतं.”

सीसीटीव्ही फुटेजही नष्ट?

मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव अधोरेखित करत राहुल गांधी म्हणाले, “आम्हाला विश्वासार्ह माहिती मिळाली आहे की, मतदानाच्या दिवशीच्या अनेक सीसीटीव्ही फुटेजेस निवडणूक आयोगाने नष्ट केल्या आहेत. हे अत्यंत धक्कादायक आहे.”

भाजपने देशविरोधी कृत्य केले – राहुल गांधींचा आरोप

“मतांची चोरी ही फक्त निवडणूक प्रक्रियेतील गडबड नाही, तर ही भारतीय राज्यघटनेच्या विरोधात रचलेली कटकारस्थान आहे. हे देशविरोधी कृत्य आहे,” असा थेट आरोप करत राहुल गांधी यांनी भाजपवर आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला.

राजकीय प्रतिक्रिया काय असतील?

या आरोपांनंतर राजकीय वातावरण आणखी तापणार हे निश्चित आहे. भाजपकडून यावर काय उत्तर दिलं जातं, आणि निवडणूक आयोग यावर अधिकृत स्पष्टीकरण देतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. राहुल गांधी यांचा हा थेट आणि पुराव्यांवर आधारित दावा विरोधकांच्या रणनीतीचा मोठा भाग असल्याचे दिसत आहे. येणाऱ्या काळात ही बाब सर्वोच्च न्यायालयात किंवा संसदीय पातळीवर गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon