जुगाराच्या अड्ड्यावर सहायक पोलीस फौजदार पकडला; ३३ जणांविरोधात गुन्हा, अधिकारी तडकाफडकी निलंबित
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – नारायण पेठेतील मोदी गणपती शेजारील हरिभाऊ साने वाहनतळावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर विश्रामबाग पोलिसांनी छापा टाकून ३३ जणांना रंगेहात पकडले. विशेष म्हणजे पकडलेल्या आरोपींमध्ये पोलीस मुख्यालयातील सहायक पोलीस फौजदार महेश महादेव भुतकर यांचाही समावेश असून, त्यांच्या निलंबनाची तातडीने कार्यवाही पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी केली आहे.
विश्रामबाग पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, सोमवारी सायंकाळी हा छापा टाकण्यात आला. आरोपी वाहनतळाच्या टेरेसवरील खोलीत पैसे लावून रम्मी हा जुगार खेळत होते. पोलिसांनी प्रविण काशिनाथ बोदवडे (वय ४४, रा. कात्रज) याच्यासह ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हा अड्डा विजय महाडिक नावाच्या इसमाच्या मालकीचा असून, त्याच्यावर यापूर्वीही जुगार प्रकरणांमध्ये कारवाई झाल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश भुजबळ यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलीस मुख्यालयातील राखीव निरीक्षकांनीही याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर केला आहे. अहवालाच्या आधारे फौजदार महेश भुतकर यांना “अशोभनीय वर्तनाने पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याबद्दल” निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.