नवी मुंबईत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर ७ महिने अत्याचार
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – उलवे पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उलवे सेक्टर १८ येथील कितीका ज्वेल्स इमारतीतील फ्लॅटमध्ये राहणाऱ्या ३९ वर्षीने व्यक्तीने एका तरुणीवर वारंवार बलात्कार, शिवीगाळ, मारहाण, जबरदस्तीने गर्भपात करवून घेणे आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उलवे पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, आरोपीचे नाव विशेष गयाप्रसाद वरुण असे असून, तो मूळचा कानपूर, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. तक्रारदार महिलेने सांगितले की, आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून १ जानेवारी २०२५ पासून २९ जुलै २०२५ या कालावधीत वारंवार आपल्या घरी बोलावून घेतले. या दरम्यान तिला वेळोवेळी शिवीगाळ, मारहाण करत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
फिर्यादी महिला गरोदर राहिल्यानंतरही आरोपीने तिच्या परवानगीशिवाय जबरदस्तीने गर्भपात घडवून आणला. तसेच, या प्रकरणाची तक्रार पोलिसांत दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तिने सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी अर्जुन रजाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच अश्विनी पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.