महाड एमआयडीसीमध्ये ८८.९२ कोटी रुपयांचे केटामाईन ड्रग जप्त करत १३ आरोपींना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – महाड एमआयडीसीमध्ये ८८.९२ कोटी रुपयांचे केटामाईन नावाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली आहे. रायगड पोलीस आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. एका बंद पडलेल्या कंपनीत हे अमली पदार्थ बनवले जात होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, महाड एमआयडीसीमधील एका बंद पडलेल्या कंपनीच्या जागेत किटामाईन बनवले जात होते. या बाबतची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून ३४ किलो केटामाईन पावडर आणि १३ किलो लिक्विड केटामाईन जप्त केले.
या प्रकरणी पोलिसांनी मच्छिंद्र तुकाराम भोसले, सुशांत संतोष पाटील, शुभम सदाशिव सुतार आणि रोहन प्रभाकर गवस यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हे अमली पदार्थ मुंबई आणि इतर शहरांमध्ये पाठवत होते. पोलिसांनी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी कारवाई करणाऱ्या पथकाचे अभिनंदन केले आहे. पोलिसांनी सांगितले की, “ही कारवाई म्हणजे अमली पदार्थांच्या बेकायदेशीर साखळीवर मोठा आघात आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.” असे पोलीस विभागातर्फे सांगण्यात आले. महाड औद्योगिक वसाहतीमधील अनेक बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये अशाच प्रकारे बेकायदेशीररित्या रात्रीच्या सुमारास अमली पदार्थ बनवण्याचा धंदा चालत असल्याचे औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यातील कामगारांकडून चर्चिले जात आहे.