राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना नवीन इमारती; ४५८ कोटींचा निधी मंजूर
रवि निषाद / मुंबई
मुंबई – राज्यातील पशुपालकांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना नव्या इमारती उभारण्यासाठी ४५८ कोटी ४१ लाख ३४ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. राज्यातील पशुवैद्यकीय सुविधा अधिक सुदृढ करण्यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे. ३४ जिल्ह्यांतील ३५७ ठिकाणी नवीन इमारती उभारल्या जाणार असून, यामध्ये दवाखान्यांची दुरुस्ती, स्वच्छतागृह उभारणी व अत्याधुनिक उपकरणे खरेदीचा समावेश आहे. यासाठी एकूण निधी रु.४५८.४१ कोटी मंजूर करण्यात आला.
या योजनेंतर्गत राज्यातील सात महसूल विभागांतील सर्व ३४ जिल्ह्यांतील पशुवैद्यकीय दवाखान्यांना नव्या सुविधांचा लाभ मिळणार आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ही सर्व कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे म्हणणे:
> “राज्यातील पशुसंवर्धन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील पशुपालकांना दर्जेदार व तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी ही योजना प्रभावी ठरेल.”
या निर्णयामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील पशुधन आरोग्य व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार असून, पशुपालकांचा आत्मविश्वास वाढण्यास निश्चितच मदत होईल.
राज्य शासनाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.