३ वर्षांच्या चिमुकलीच्या अपहरणानंतर खून; अँटॉप हिल पोलिसांची अवघ्या १२ तासांत धडक कारवाई; आरोपी गजाआड
मुंबई – अँटॉप हिल परिसरात घडलेल्या एका अत्यंत संतापजनक घटनेत केवळ तीन वर्षांच्या चिमुकलीचा अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, अँटॉप हिल पोलिसांनी अवघ्या १२ तासांत तपासाची चक्रे फिरवत आरोपीला जेरबंद केले आहे.
दिनांक १५ जुलै २०२५ रोजी रात्री १२:४५ वाजता नाजीय शेख (वय ४०) यांनी अँटॉप हिल पोलिस ठाण्यात आपल्या ३ वर्षे ११ महिन्यांच्या मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली होती. त्यांच्या फिर्यादीप्रमाणे, ही घटना १४ जुलै रोजी रात्री ८ वाजल्यापासून १५ जुलैच्या पहाटे १२:१० दरम्यान घडली होती. यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. १५ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजता कुलाबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात बालिकेचा मृतदेह आढळून आला. तपासाअंती तिची ओळख अपहृत मुलगी म्हणून पटली. त्यानंतर गुन्ह्यात गंभीर कलमांची वाढ करण्यात आली. भादंवि कलम १०३, १४०(२), २३८ तसेच बाल न्याय (बालकांचे संरक्षण) अधिनियम २०१५ अंतर्गत कलम ७५ लागू करण्यात आले.
या गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी १० विशेष पथके तयार करण्यात आली. तब्बल १६२ सीसीटीव्ही फुटेजचा आढावा घेत पोलिसांनी आरोपीचा माग काढला. आरोपी सतत ठिकाण बदलत होता. मात्र तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचे लोकेशन लोअर परळ परिसरात सापडले. वरळी नाका बस स्थानकावरून तो पलायन करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली. अटक केल्यानंतर आरोपीने कबुली दिली की मृत मुलगी ही त्याच्या आणि पत्नीच्या नात्यातील अडथळा बनत होती. रागाच्या भरात त्याने तिचं अपहरण करून भाऊचा धक्का परिसरात नेऊन गळा दाबून खून केला आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह समुद्रात फेकून दिला.
या गुन्ह्याच्या उकल आणि जलद कारवाईबद्दल अँटॉप हिल पोलिसांची वाहवा होत आहे. ही उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) श्री. सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त श्री. विक्रम देशमाने, पोलीस उप आयुक्त श्रीमती रागसुधा आर, सहायक पोलीस आयुक्त श्री. शैलेंद्र धिवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक: केशवकुमार कसार, पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले, किशोरकुमार राजपूत, महिला पोलीस निरीक्षक अर्चना पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक: शिवाजी मदने, प्रदीप पाटील, अण्णासाहेब कदम, कांबळे, निगुडकर, पोलीस उपनिरीक्षक: विनोद पाटील, सिद्दकी, राहुल वाघ, केदार उमाटे, गौरव शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक: सरोजिनी इंगळे, पूजा शिर्के, पोलीस हवालदार: टेले, गस्ते, सानप, ठोके, सिंग, तांबे, पोलीस शिपाई आमदे, किरतकर, सजगणे, पाटील, माने (२), खोत, बार्थी, चव्हाण, सांगर, भोसले, घाडगे, ठाकूर, महिला पोलीस शिपाई: मांढरे
या घटनेने शहर हादरले असले तरी पोलिसांची वेगवान कारवाई आणि सखोल तपास कार्यक्षमतेचा उत्तम नमुना ठरली आहे.