मुंबई, नवी मुंबई व ठाण्यात ‘ऑनलाइन लॉटरी’चा गोरखधंदा उघड!
अब्दुल रहमान व उस्मान गणीच्या टोळीचा पर्दाफाश; प्रशासन गप्प का?
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे शहरांमध्ये “खेलो इंडिया खेलो”, “साईं लॉटरी” आणि “जनता लॉटरी”च्या नावाने मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन लॉटरीचा अवैध धंदा सुरू असून, शासन आणि पोलीस प्रशासन अद्याप गप्प असल्यामुळे हा प्रकार अधिकच बळावत चालल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे, या धंद्यामागे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नामवंत आरोपी कार्यरत असून, पैशांची वसुली “अब्दुल रहमान” नावाचा एक खबरी करत असल्याचे पोलिसांच्या विशेष सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. रहमान, स्वतःला काही राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांशी आणि पोलिस उच्च अधिकाऱ्यांशी जोडलेले असल्याचे भासवून, लॉटरी चालविणाऱ्यांकडून खुलेआम हप्ते वसूल करतो.
या टोळीत उस्मान गणी या गुन्हेगारी इतिहास असलेल्या इसमाचाही समावेश आहे. त्याच्यावर मुंबई, नवी मुंबई, सातारा यासारख्या ठिकाणी ३० हून अधिक लॉटरी संदर्भातील गुन्ह्यांची नोंद आहे. आधी तो वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेकरवी वसुली करत होता, तर आता अब्दुल रहमानसह पुन्हा सक्रिय झाला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यापर्यंत या टोळीचा जाळं पसरले असून, अनेक ठिकाणी स्थानिक राजकीय नेत्यांचे वरदहस्तही त्यांना लाभले आहे. अब्दुल रहमान व उस्मान गणी यांच्या इशाऱ्यावर काही ठिकाणी हप्तेवसुलीचे काम कमिशनवर चालते, जे स्थानिक एजंटमार्फत पार पडते. या अवैध लॉटरीमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असून, शासकीय राजस्वालाही मोठा फटका बसत आहे. तरीसुद्धा, प्रशासन या गंभीर प्रकरणात का गप्प आहे? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे. पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून तत्काळ लक्ष घालून या टोळीचे जाळे उध्वस्त करणे अत्यावश्यक आहे.