निकेत कौशिक यांनी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला
गुन्हेगारी आळा घालण्यासाठी आणि लोकहितासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प
मिरा-भाईंदर/वसई-विरार :
भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी श्री. निकेत कौशिक यांनी गुरुवारी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे नवीन आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. श्री. मधुकर पाण्डेय (भा.पो.से.) यांची अपर पोलीस महासंचालक (प्रशासन), महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी कौशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारतेवेळी आयुक्तालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यात श्री. दत्तात्रय शिंदे (अपर पोलीस आयुक्त), श्री. संदिप डोईफोडे (पोलीस उप आयुक्त – गुन्हे), श्री. अशोक विरकर (पोलीस उप आयुक्त – मुख्यालय), श्री. प्रकाश गायकवाड (पोलीस उप आयुक्त – परिमंडळ १), श्रीमती पौर्णिमा चौगुले-श्रींगी (परिमंडळ २), व श्री. सुहास बायचे (परिमंडळ ३) यांचा समावेश होता. श्री. निकेत कौशिक हे यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई येथे कार्यरत होते. पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या उद्दिष्टांबद्दल स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी म्हटले:
> “मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस दल हे येथील नागरिकांचे जीवन, स्वातंत्र्य व कायदेशीर हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहाय’ हे ब्रीदवाक्य आमच्या कार्याचा मूलमंत्र आहे. आम्ही समाजातील चांगुलपणाचे रक्षण करत असताना गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवू.”
त्यांनी पुढे सर्व नागरिकांना कायदे व नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत सांगितले की, “सामूहिक प्रयत्नांतून आपण या परिसरात शांतता, सुव्यवस्था आणि समृद्धी नक्कीच निर्माण करू शकतो.” श्री. निकेत कौशिक यांच्या नेतृत्वात मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस दल नव्या जोमाने कार्यरत होणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.