मीरा भाईंदरच्या मोर्चात हायव्होल्टेज ड्रामा; मनसेच्या महिला आघाडीला आवारताना पोलिसांना नाकीनऊ
योगेश पांडे / वार्ताहर
भायंदर – मराठीच्या मुद्द्यावरुन मिरारोड-भाईंदर परिसरात मनसेकडून मंगळवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे सध्या मुंबईतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. मीरा-भाईंदर पोलिसांनी या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली होती. तसेच या परिसरात कलम १४४ लागू करुन जमावबंदीचा आदेश काढला होता. कोणत्याही आंदोलकाने मोर्चासाठी येऊ नये, अशी ताकीद पोलिसांकडून देण्यात आली होती. मात्र, तरीही सकाळी १० वाजताच मनसे , ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते या परिसरात जमले आणि याठिकाणी जोरदार राडा पाहायला मिळाला. मिरारोडच्या बालाजी हॉटेलपासून या मोर्चाची सुरुवात होणार होती. संपूर्ण मिरारोड भाईंदर परिसरात सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याठिकाणी सकाळी १० वाजता मराठी आंदोलक येऊ लागल्यानंतर पोलिसांनी त्यांची धरपकड सुरु केली.
बालाजी हॉटेलच्या परिसरात जमलेल्या मराठी आंदोलकांमध्ये महिला कार्यकर्त्यांचाही मोठ्याप्रमाणावर समावेश होता. या महिला कार्यकर्त्या पोलिसांना ऐकायला तयार नव्हत्या. आंदोलन करणं आमचा हक्क आहे. अमराठी लोकांना आंदोलन करुन दिले जाते मग आमच्या मोर्चाला परवानगी का नाकारली जाते, असे प्रश्न या महिला आंदोलक पोलिसांना विचारत होते. यापैकी एका महिला आंदोलकाने एक धक्कादायक गोष्ट सांगितली. तिने म्हटले की, पोलीस सगळ्या मराठी आंदोलकांना पकडत असताना रस्त्याच्या कडेला काही गुजराती आणि मारवाडी लोक उभे होते. ते पोलिसांना सांगत होते की, ‘यांना असंच पळवा, यांना एकत्र येऊन देऊ नका. मीरा भाईंदरमध्ये यांचं आम्ही चालू देणार नाही’, असे ते गुजराती आणि मारवाडी लोक बोलत असल्याचे मी माझ्या कानांनी ऐकल्याचे संबंधित महिला कार्यकर्त्याने सांगितले. आम्हाला बोलायची परवानगी का नाही? अमराठी लोकांचा मोर्चा निघाला होता त्यावेळी कायदा सुव्यवस्था कुठे होती? त्यांना मोर्चा काढायला का दिला?, असे प्रश्नही या महिला कार्यकर्त्याने विचारला.
पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत कलम १४४ लागू केल्याने संतप्त वातावरण पाहायला मिळाले होते. मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते ठरल्यानुसार सकाळी १० वाजता बालाजी हॉटेल चौकात जमायला सुरुवात झाले. पोलिसांनी त्यांची धरपकड सुरु केल्यानंतर घटनास्थळी जोरदार राडा पाहायला मिळायला. या सगळ्यानंतर पोलिसांनी अचानक आपली भूमिका बदलत मोर्चेकऱ्यांना बालाजी हॉटेल चौक ते मीरारोड स्टेशनपर्यंत जाण्याची परवानगी दिली.