डेटिंग अॅपवरून आर्थिक गंडा – आंतरराज्यीय फसवणूक टोळीचा पर्दाफाश, २२ जणांना अटक
मुंबई : डेटिंग अॅपवरून मुलांच्या भावनांशी खेळत आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीने मुलींच्या बनावट प्रोफाईलद्वारे हॉटेलमध्ये बोलावून लाखोंच्या वसुलीचा कट रचला होता. विशेष कारवाईत एकूण २२ जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये १५ पुरुष व ७ महिला आहेत. फिर्यादी गौरेश परब (वय २७) यांना ‘Tinder’ या डेटिंग अॅपद्वारे संपर्क साधून बोरीवली पश्चिमेतील ‘टाईम्स स्क्वेअर’ हॉटेलमध्ये भेटायला बोलावण्यात आले. हॉटेलमध्ये ड्रींकचा बहाणा करून संवाद साधण्यात आला आणि हॉटेल मॅनेजरच्या मदतीने ३५,००० रुपयांचे बनावट बिल बनवून फिर्यादीकडून १४,७०० रुपये QR कोडने ऑनलाईन घेतले गेले.
तक्रारीनंतर एमएचबी कॉलनी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाइल लोकेशन ट्रॅकिंगच्या आधारे दिघा, नवी मुंबई येथील विविध हॉटेलांवर १२ तास नजर ठेवली. पहाटेच्या वेळी पोलिसांनी धाड टाकत १५ पुरुष व ६ महिलांना ताब्यात घेतले. टोळीच्या अटकेवेळी २७ मोबाईल, एक पोर्टेबल प्रिंटर, फोनपे स्वाईप मशीन अशा ३.७४ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. फसवणुकीची मास्टर प्लानिंग टोळीचा प्रमुख मोहसिन व फरहान हे उत्तर प्रदेशातील असून, त्यांनी दिल्ली व गाझियाबादमधून युवक-युवतींना बोलावून ‘Tinder’, ‘Bumble’, ‘Aisle’, ‘Mingle 2’ सारख्या डेटिंग अॅपवर बनावट महिला प्रोफाईल तयार केल्या. हे फेक प्रोफाईल वापरून संभाव्य पुरुष टार्गेटशी मैत्री केली जात असे आणि ठरावीक हॉटेलमध्ये भेटीची व्यवस्था केली जाई. त्यानंतर बाउन्सर, मॅनेजर आणि इतर टोळी सदस्यांच्या मदतीने अवाजवी बिल वसूल केले जाई. या प्रकरणात ‘टाईम्स स्क्वेअर’ हॉटेलचा मॅनेजर शैलेश उर्फ शैलेश अण्णा यालाही अटक करण्यात आली आहे. आरोपींनी हॉटेल व्यवस्थापनासोबत ५० टक्के हिस्सा वाटून फसवणूक सुरू केली होती.
पोलिसांची उल्लेखनीय कारवाई
मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील विविध हॉटेल्समध्ये या टोळीने अशा पद्धतीने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या कौशल्यपूर्ण मानवी आणि तांत्रिक तपासामुळे ही आंतरराज्यीय टोळी अखेर पोलिसांच्या तावडीत सापडली.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त शशिकुमार मीणा, पोउआ आनंद भोईटे, सपोआ सुनिल जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पोलिसांच्या या कठोर आणि अचूक कारवाईने डेटिंग अॅपवरून होणाऱ्या फसवणुकीला मोठा आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.