मुख्य फरार आरोपी हैद्राबाद विमानतळावर अटकेत; मानपाडा पोलिसांची आंतरराज्यीय कारवाई यशस्वी; २.१२ कोटींच्या एमडी प्रकरणातील आरोपी फरहान शेवटी जेरबंद
डोंबिवली – मानपाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठ्या शिताफीने आणि नियोजनबद्ध तपासाच्या आधारे २.१२ कोटींच्या मेफेड्रॉन (एमडी) प्रकरणातील मुख्य फरार आरोपीला अटक केली आहे. आरोपी मोहम्मद रहिम सलीम शेख उर्फ ‘फरहान’ यास हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. तो परदेशात पलायन करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
मानपाडा पोलीस ठाणे, डोंबिवली हद्दीतील डाउन टाउन, खोणी-पलावा परिसरात १.९३ किलो मेफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ सापडल्याने गु.र.नं. ७३१/२०२५ प्रमाणे दिनांक २७ जून २०२५ रोजी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. सदर प्रकरणात यापूर्वी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती:
१. असिल जाबर सुर्वे (वय २६)
२. मोहम्मद इसा मोहम्मद हनीस कुरेशी
३. मेहेर फातिमा रिजवान देवजानी (महिला आरोपी)
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरहान हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सतत फरार होता.
आंतरराज्यीय पातळीवरील शोधमोहीम:
दिनांक २९ जून २०२५ रोजी पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे कळाले की आरोपी परदेशात पळून जाण्याच्या प्रयत्नात आहे. त्यानुसार विशेष पथकाने तत्काळ कारवाई करत हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला ताब्यात घेतले आणि अटक केली. दिनांक ३० जून रोजी न्यायालयात हजर केल्यावर ०७ जुलै २०२५ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आला आहे.
आरोपीविरुद्ध इतर गुन्ह्यांची नोंद:
फरहानविरोधात यापूर्वीही मुंब्रा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १५७०/२०२४ अन्वये एनडीपीएस कायदा व भारतीय दंड संहितेच्या कलम ४८२ अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवलेला आहे.
सदर कामगिरी अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण, अतुल झेंडे व सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीपन शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राम चोपडे, सहायक पोलीस निरीक्षक कलगोंडा पाटील, संपत फडोळ, महेश राळेभात, सागर चव्हाण, पोलीस शिपाई मिननाथ बडे, किशोर दिघे यांचा समावेश होता.
पोलीसांचे सतर्क आणि आंतरराज्यीय पातळीवरील हे कसब पुनः एकदा ठळकपणे अधोरेखित झाले असून, अंमली पदार्थाच्या विरोधात पोलिसांची झटका मोहिम अधिक बळकट होत असल्याचे या घटनेवरून दिसून येते.