टिळकनगरमधील लॉजिंग मालकाला डी.के. रावच्या नावाने धमकी; पोलिस तपास सुरू
पोलीस महानगर नेटवर्क
चेंबूर : टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सफलता लॉजिंग बोर्डिंग या ठिकाणी मूळ मालकाला डॉन डी.के. रावच्या नावाने धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी महेश आचार्य या मूळ मालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस तपास सुरू केला आहे. प्राप्त माहितीनुसार, दिवाकर प्रजापती नावाच्या व्यक्तीने काही वर्षांपूर्वी सफलता लॉजिंग बोर्डिंग भाडेकरारावर घेतले होते. मात्र, ठराविक कालावधीनंतर त्याचा एग्रीमेंट संपला असून त्याने नवीन करार केला नव्हता. तरीही त्याने खोटे कागदपत्र वापरून वीजबिल आपल्या नावावर करून घेतले, असा आरोप महेश आचार्य यांनी केला आहे.
महेश आचार्य यांनी याबाबत तिलकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर, दिवाकर प्रजापती आणि त्याचा साथीदार कार्तिक नाडार यांनी स्वतःला डी.के. रावचा माणूस असल्याचे सांगून धमकावल्याचे महेश आचार्य यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते प्रचंड मानसिक तणावात असून त्यांनी आपल्या वकिलामार्फत संबंधित प्रशासकीय आणि पोलिस विभागांकडे अधिकृत तक्रार पाठवली आहे.
तपासात सहभागी असलेल्या पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी स्वतःला डॉन डी.के. रावचा हस्तक असल्याचा दावा करतात, ज्यामुळे मूळ मालकाला भीती वाटू लागली आहे. याप्रकरणी फसवणूक, खोट्या कागदपत्रांचा वापर आणि धमकी यांसारख्या गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित व्यक्तींच्या पार्श्वभूमीची चौकशीही केली जात आहे. परिसरात अशा प्रकारची माफियागिरी चालवणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.