शिक्षिकेचा अल्पवयीन विद्यार्थ्याला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार; दादर पोलीसांनी शिक्षिकेला ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – शिक्षकांना, गुरूंना आपल्याकडे देवाचा दर्जा देण्यात येतो. त्यांना देवासमान मानून कित्येक जण त्यांची पूजा करतात, आशिर्वाद घेतात. पण शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या एका महिला शिक्षिकेने अतिशय भयानक कृत्य केल्याची, सर्व शिक्षकांना शरमेने मान खाली घालायला लागेल असे वागल्याची किळसवाणी घटना उघडकीस आली आहे. प्रत्येक पालक हे आपल्या मुलांना खूप विश्वासाने शाळेत पाठवतात, शिक्षकांवर त्यांचा अतोनात विश्वास असतो. मात्र मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिकेने जे कृत्य केलं त्यामुळे शिक्षकच भक्षक बनल्याची चर्चा आहे. देशातील टॉप पाच शाळांपैकी एक मानल्या जाणाऱ्या, मुंबईतील एका शाळेतील शिक्षिकेने तिच्या विद्यार्थ्यावर अत्याचार करत त्याचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्या शिक्षिकेला बेड्या ठोकून अटक केली आहे. ती महिला शिक्षिका गेल्या वर्षभरापासून त्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करत होती असा आरोप आहे. आणि ही अत्यंत अश्लील घटना कोणत्याही सुनसान जागी नव्हे तर शहरातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घडत होती. हा भयाक, किळसवाणा प्रकार उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. दादर पोलिसांनी त्या शिक्षिकेविरुद्ध पोक्सो कायदा, बाल न्याय कायदा आणि फौजदारी संहितेच्या इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी दादर पोलिसांनी आरोपी शिक्षिकेविरुद्ध पोक्सो कायदा, बाल न्याय कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व कायदे मुलांविरुद्ध लैंगिक गुन्हे करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी बनवण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षिकेने विद्यार्थ्यावर मानसिक दबाव आणला आणि त्याला इतके दिवस गप्प बसवले. एवढंच नव्हे तर ती त्याला मद्य द्याचीच तसेच नैराश्याविरोधी औषधे देत असे. या औषधांमुळे विद्यार्थ्याची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमताही कमकुवत होत होती. तो भीतीच्या सावटाखाली आणि संकोचून जगत होता. तसेच आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल तो कोणालाही काहीही सांगू शकत नव्हता. हैराण करणारी बाब म्हणजे आरोपी शिक्षिकेने हे घृणास्पद कृत्य एकदा-दोनदा नाही तर अनेक वेळा केले आहे. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता. आरोपी शिक्षिका ही शालेत शिकवायची. त्यानंतर ती पीडित विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील अनेक फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये न्यायची आणि त्याच्यावर अत्याचार करत लैंगिक शोषण करायची. तिने हे सर्व कृत्य अत्यंत हुशारीने आणि विचारपूर्वक केले होते.
अखेर बराच काळ सगळं सहन केल्यानंतर, अखेर त्या विद्यार्थ्याने बारावीची परीक्षा दिली आणि त्याने तिच्या पालकांना संपूर्ण सत्य सांगितले. त्या शिक्षिकेने त्याला एका नोकराद्वारे बोलावले आणि नंतर अनेक वेळा लैंगिक शोषण कसे केले, त्याचा संपूर्ण घटनाक्रम कथन केला. हे ऐकून त्या विद्यार्थ्याचे आई-वडील हादरलेच. पण त्यांनी हिंमत दाखवली आणि आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्याचा चंग बांधत पोलिसांत धाव घेतली. सर्व प्रकार सांगत त्यांनी न घाबरता त्या शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. अखेर दादर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी शिक्षिकेला अटक केली असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे.