नाशिकमध्ये गोवंश वाहतूक प्रकरणात मोठी कारवाई: ९ गायी व ६ वासरांची सुटका, दोघांना अटक
पोलीस महानगर नेटवर्क
नाशिक – गोवंशाची कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रकवर पोलिसांनी धाड टाकत ९ गायी आणि ६ वासरांची सुटका केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने नाशिक-पुणे रोडवरील चेहडी गावाजवळ, दारणेश्वर मंदिरासमोर केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, नाशिकरोड पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट २ चे अधिकारी मनोहर शिंदे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, एक ट्रक गोवंश वाहून नेत आहे. त्यानुसार सापळा रचून जीजे २४ व्ही ८५६३ क्रमांकाचा ट्रक अडवण्यात आला. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये गायी आणि वासरे अमानुषरीत्या कोंबून ठेवलेली आढळली. बिलाल उस्मान मरेडिया, रा. पाटण व महेंद्रसिंग जगतसिंग जाधव, रा. बनासकाठा, गुजरात. दोन आरोपींना ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, शंकर काळे यांच्या पथकाने केली. सुटवलेले सर्व गोवंश पांजरपोळ संस्थेत संगोपनासाठी पाठवण्यात आले आहेत. प्राथमिक तपासानुसार, ही वाहतूक कत्तलीसाठीच केली जात होती, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अधिक तपास सुरू आहे.