राष्ट्रवादी आमदाराच्या पीएने सरपंच पतीची केली फसवणूक; ६.७० लाखांचा गंडा – बीडमध्ये गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
बीड – राष्ट्रवादी काँग्रेसचे छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांचे स्वीय सहाय्यक नयन शेजुळ याच्यावर फसवणुकीचा गुन्हा बीड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. बीड तालुक्यातील सरपंच पती उत्तरेश्वर खताळ यांची ६ लाख ७० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप शेजुळवर करण्यात आला आहे.
फसवणुकीचे स्वरूप
शेजुळ याने “आमदार निधी” किंवा “जिल्हा परिषदेमार्फत काम मिळवून देतो” अशी बतावणी करून उत्तरेश्वर खताळ यांच्याकडून मोठी रक्कम उकळली. त्याने बनावट ई-मेल तयार करून त्या ई-मेलमध्ये काम मंजूर झाल्याचे खोटे भासवत खताळ यांच्याशी संवाद साधला. या विश्वासावर खताळ यांनी शेजुळला तब्बल ६.७० लाख रुपये दिले. मात्र, पैसे मिळाल्यानंतर शेजुळ याने काम न देता सतत टाळाटाळ सुरू ठेवली.
फसवणूक उघडकीस आल्यानंतर…
काही काळानंतर कोणतेही काम मंजूर झालेले नाही, हे उत्तरेश्वर खताळ यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ बीड शहर पोलीस ठाणे गाठत नयन शेजुळविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ
या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आमदाराच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यानेच अशा प्रकारची फसवणूक केल्याचे समोर आल्यानंतर आमदार विक्रम काळे यांची भूमिका काय असेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील तपास सुरू असून आरोपीवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.