७ कोटींच्या अमली पदार्थांसह परदेशी महिलेला अटक

Spread the love

७ कोटींच्या अमली पदार्थांसह परदेशी महिलेला अटक

मुंबई – महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत तब्बल ७ कोटी रुपयांच्या अमली पदार्थांसह एका नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली आहे. ब्लेसिंग फेवर ओबोह (वय २३) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, तिच्याकडून अँफेटामाईन आणि एक्स्टसी हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, सदर महिला दिल्लीहून मुंबईकडे बसने प्रवास करत होती. तिच्याकडे मोठ्या प्रमाणात अँफेटामाईन असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर वांद्रे येथील काळानगर बस स्थानकावर सापळा रचून तिच्यावर कारवाई करण्यात आली. तपासणी दरम्यान तिच्या ट्रॉली बॅगेतून २ किलो ५६३ ग्रॅम अँफेटामाईन आणि ५८४ ग्रॅम एक्स्टसी या अमली पदार्थांच्या गोळ्या आढळून आल्या. या दोन्ही रसायनांना एनडीपीएस कायद्यांतर्गत प्रतिबंधित मानले गेले असून त्यांचा वापर प्रामुख्याने पार्टी ड्रग्स म्हणून होतो. या कारवाईनंतर आरोपी महिलेला डीआरआयच्या कार्यालयात नेण्यात आले असून, महिला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिची सखोल चौकशी करण्यात आली.

चौकशीदरम्यान महिलेने कबुल केले की, तिला पैशांच्या मोबदल्यात हे ड्रग्ज भारतात आणण्याचे काम देण्यात आले होते. या तस्करीसाठी मोठी रक्कम मिळणार असल्याचे आमिष तिला दाखवण्यात आले होते. मात्र, मुंबईत पोहोचण्यापूर्वीच तिला अटक करण्यात आली. या प्रकरणामागे एक आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असून, चौकशीत आणखी एका संशयिताचा सहभाग स्पष्ट झाला आहे. त्या व्यक्तीची ओळख पटली असून, त्याचा शोध सध्या सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. प्रकरणाचा तपास सध्या प्राथमिक टप्प्यात असून मुख्य सूत्रधार आणि साथीदारांपर्यंत पोहोचण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, यापूर्वीही डीआरआयने बोरिवली परिसरातून एक्स्टसी तस्करीप्रकरणी एका तरुणाला अटक केली होती. बेल्जियमहून पार्सलद्वारे आलेल्या ड्रग्जबाबत सीमाशुल्क विभागाला संशय आला होता. तपासणीमध्ये ९७५ ग्रॅम एमडीएमए सापडले होते. पार्टी ड्रग्ज म्हणून ओळखले जाणारे अँफेटामाईन आणि एक्स्टसी परदेशात प्रचंड मागणी असलेले अमली पदार्थ असून, आता भारतातही त्यांची मागणी वाढत आहे. त्यामुळे अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून अधिक सतर्कता बाळगली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon