मुंबईत ६० वर्षीय पतीने ५३ वर्षीय पत्नीवर झाडल्या गोळ्या; बंदुकीतून गोळी झाडून स्वत:ही संपवले जीवन
योगेश पांडे – वार्ताहर
मुंबई – राजधानी मुंबईत गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडतात, त्यामध्ये गुंडगिरी, अंडरवर्ल्ड व आर्थिक देवाण-घेवाणीतून घटना घडत असतात. तर, अनेक कौटुंबिक कलहातूनही हत्यासारखे गंभीर गुन्ह घडल्याचं समोर येतं. आता, मुंबईतील वरळी भागात आज सकाळी एका ६० वर्षीय पतीने आपल्या पत्नीची देशी बनावटीच्या बंदुकीने गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर, त्याच बंदुकीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने हत्या केलेल्या पत्नीचे वय ५३ वर्षे होते. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली या हत्याकांडाचे नेमकं कारण अद्याप समोर आले नसून पोलीस तपास सुरू आहे. पत्नीची हत्या करणाऱ्या पतीकडे नेमकं पिस्तूल कुठून आले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. वरळी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला करत तपास सुरू केला आहे. तसेच, पोलिसांनी घटनास्थळावरून बंदूक जप्त केली असून दोन्ही मृतदेह शवविच्छेनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.