लव्ह, सेक्स आणि धोका; कॅबिनेट मंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या मुलाचे प्रताप, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Spread the love

लव्ह, सेक्स आणि धोका; कॅबिनेट मंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या मुलाचे प्रताप, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

मंत्र्यांच्या दबावामुळे पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा पिडीत महिलेचा नोटीसीतून आरोप

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री शिवसेना नेते संजय शिरसाट हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण संजय शिरसाटांचे सुपुत्र सिद्धांत यांच्यावर एका विवाहित महिलेकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सिद्धांत यांनी फसवणूक केली असून त्यांच्याविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी , हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. संबंधित महिलेने ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, सिद्धांत शिरसाटांसोबत २०१८ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. या ओळखीनंतर त्यांची मैत्री झाली आणि चेंबूर येथील एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेट झाली. याच फ्लॅटवर शारीरिक संबंध झाले. यानंतर सिद्धांत यांनी लग्नासाठी तगादा लावला. मात्र संबंधित महिला आधीच विवाहित होती. त्यामुळे सिद्धांत यांनी तिला भावनिक ब्लॅकमेल करुन, लग्न कर अन्यथा मी आत्महत्या करेन, असा आग्रह धरला. यानंतर सिद्धांतच्या भावनिक आवाहनवर विश्वास ठेवून दोघांनी लग्न केलं, असा दावा संबंधित महिलेने केला आहे. सिद्धांत शिरसाट यांच्यासोबत १४ जानेवारी २०२२ रोजी बौद्ध पद्धतीने लग्नही केल्याचा दावा संबंधित महिलेने केला आहे. इतकंच नाही तर त्याबाबत आपल्याकडे पुरावेही आहेत. एवढ्यावरच न थांबता, या संबंधातून महिलेला गर्भधारणाही झाली, मात्र सिद्धांत यांनी जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याचा आरोपही महिलेने नोटीसमध्ये केला आहे.

दरम्यान, सिद्धांत यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर त्यांच्या वर्तनात बदल झाल्याचा दावा महिलेने केला आहे. सिद्धांत यांनी चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगून छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जाण्यास नकार दिला. सिद्धांत यांचे यापूर्वीचे विवाह संबंध आणि इतर महिलांसोबत असलेले संबंध उघडकीस आल्यावर धमकी देण्यास सुरुवात केली. “तू जर पोलिसांकडे गेलीस तर मी आत्महत्या करेन आणि तुझे संपूर्ण कुटुंब उध्वस्त करेन” अशा धमक्याही देण्यात आल्याचे आरोप महिलेने केले आहेत.

पीडित महिलेने २० डिसेंबर २०२४ रोजी शाहूनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र सिद्धांत यांचे वडील संजय शिरसाट हे मंत्री असल्यामुळे पोलिसांनी कारवाई न करता प्रकरण दाबल्याचा आरोपही कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, सिद्धांत शिरसाट यांनी संबंधित महिलेला सात दिवसांच्या आत नांदविण्यासाठी घरी घेऊन जावे आणि न्याय द्यावा, अन्यथा महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक यांसारख्या विविध कलमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. दरम्यान, सिद्धांत शिरसाट यांनी फोन करुन त्रास दिल्यास कुटुंबाला गुंडांकडून संपवून टाकू अशी धमकी दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. माझे वडील मंत्री होणार आहेत आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उजवे हात आहेत, असा दावा सिद्धांत यांनी केल्याचा आरोप महिलेचा आहे. एकंदरीत या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon