शिर्डीतून चोरी गेलेला दोन कोटी ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलीस महानगर नेटवर्क
अहिल्यानगर – लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील एका हॉटेलमधून व्यापाऱ्याचे दोन हजार ६८७ ग्रॅम वजनाचे सोने असा एकूण तीन कोटी २६ लाख रुपये किमतीच्या सोन्याची चोरी झाली होती. या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेतलाअसता पुणे येथून तब्बल दोन कोटी ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असल्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
सोन्याच्या व्यापाऱ्याच्या सोन्याच्या पार्सलची चोरी
शिर्डी येथे एका सोन्याच्या व्यापाऱ्याच्या सोन्याच्या पार्सलची चोरी १३ मे रोजी हॉटेलमधून झाली होती. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे करत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित (रा.चौहटन, जि.बारमरे, राजस्थान) याने चोरी केली असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने आरोपीचे नातेवाईक यांना विश्वासात घेऊन गुन्हयाचे गांभीर्य समजून सांगितले.
भावाने पोलिसात दिली खबर
आरोपी व या गुन्हयातील मुद्देमालाबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास पोलिसात खबर द्यावी, असे आवाहन केले. त्यानंतर आरोपीने पुणे येथे असलेल्या त्याच्या भावाकडे चोरी केलेले पार्सल ठेवताच त्याच्या भावाने पोलिसात खबर दिली. त्यानुसार चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, संतोष लोढे, अरुण गांगुर्डे, किशोर शिरसाठ, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड व चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने केली.