मेसर्स ॲक्सेस फायनान्स फसवणूक प्रकरण; मालक प्रविण ओभनला २९ मेपर्यंत पोलिस कोठडी
मुंबई – चेंबूर येथील मुंबई महापालिकेच्च्या सादपति रुग्णालयासमोर असलेल्या मेसर्स ॲक्सेस फायनान्स कंपनीचा मालक प्रविण ओभन याला मुंबई पोलिसांनी १८ मे रोजी अटक केली. त्याच्यावर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ओभन यांनी १० ते २० टक्के व्याजाचे आमिष दाखवून १००० पेक्षा अधिक गुंतवणूकदारांकडून पैसे उकळले. मात्र, ना मूळ रक्कम परत केली, ना व्याज दिले. फसवणूक झालेल्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक, सरकारी कर्मचारी, निवृत्त व्यक्ती आणि विधवा महिलांचा समावेश आहे.
निवेशकांनी अनेकदा कंपनीकडे तक्रारी केल्या, पण त्यांना बाऊंसर आणि गुंडांच्या धमक्यांना सामोरे जावे लागले. शेवटी शेकडो लोकांनी गोवंडी पोलिस स्टेशन आणि परिमंडळ – ६ चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्याकडे तक्रार दाखल केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ओभन कॅनडाला पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्याला अटक केली. आज त्याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी सांगितले की, आतापर्यंत ७०० तक्रारी दाखल आल्या असून फसवणुकीची एकूण रक्कम १७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
पोलिसांनी ओभनचे ९ बँक अकाउंट्स गोठवले असून, कंपनीच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉप व संगणकातून फसवणुकीचे पुरावे मिळाले आहेत. यावरून पोलिसांनी १० दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर प्रविण ओभनला २९ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सदर कारवाई पोलीस नवनाथ ढवले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून, पोलिसांना आणखी तक्रारी आणि मोठ्या रकमेच्या फसवणुकीचा उलगडा होण्याची अपेक्षा आहे.