चिल्ड्रेन्स एड सोसायटी विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
शाळेतील ४१ वर्षांच्या वाटचालीना उजाळा
रवि निषाद/मुंबई
मुंबई – मानखुर्द येथील चिल्ड्रेन्स एड सोसायटी माध्यमिक विद्यालयात दिनांक ४ मे २०२५ रोजी आजी-माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यालयाने यावर्षी आपल्या ४१ व्या वर्षात पदार्पण केले असून,या निमित्ताने हा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी,माजी शिक्षकवर्ग तसेच मोठ्या संख्येने आजी व माजी विद्यार्थी उपस्थित होते. ह्यावेळी संस्थेचे मुख्याधिकारी,मा.श्री.बापुराव भवाने, उपमुख्याधिकारी मा.श्री.सतीश बनसोडे,माजी मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर कावळे उपस्थित होते. शाळेच्या प्रांगणात दुपारी ४ ते रात्री १० ह्यावेळेस हे संमेलन पार पडले.स्नेहसंमेलनाच्या औचित्याने शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.चौडणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.सरांनी आपल्या अनुभवातून बोलताना मराठी शाळांच्या गरजेवर आणि उपयुक्ततेवर भर दिला.”स्वतःच्या रोजीरोटीच्या संघर्षात असलेल्या पालकांकडून महागड्या इंग्रजी शाळांचे डोनेशन परवडणार कसे? त्यामुळे मराठी शाळा टिकणे अत्यावश्यक आहे,” असे ते म्हणाले.त्यांनी विद्यार्थ्यांना तीनही भाषा — मराठी,हिंदी आणि इंग्रजी यांचा समतोल अभ्यास करावा, असे सांगितले.त्यामुळेच व्यवहारातील चतुरपणा व आत्मविश्वास निर्माण होतो, असे त्यांनी उदाहरणांसहित स्पष्ट केले.चौडणकर सरांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की,कष्टकरी कुटुंबातील मुलांना शाळेत प्रवेश देताना त्यांनी कधीच कुणाला नाकारले नाही.आज त्यातील अनेक विद्यार्थी उच्चपदांवर आहेत,हे सांगताना सर आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत भावनांचा ओलावा स्पष्टपणे दिसून येत होता.या वेळी बोलताना म्हात्रे मॅडम यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या गुणांनी आणि कर्तृत्वानेच शाळेचा नावलौकिक वाढतो. शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी जर एकत्र आले, तर हे सहज शक्य आहे.”त्यांनी इच्छाशक्ती आणि नियोजनावर भर देण्यास सांगितले.
विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला की जीवनात येणाऱ्या चढउतारांमध्ये हार मानू नये, तर संघर्ष करत झेप घ्यावी.संपूर्ण वातावरण हे एक वेगळेच भावनिक व ऊर्जायुक्त होते. कार्यक्रमात गीत-संगीत, आठवणीं आदानप्रदान व स्नेहभोजनाने समारोप करण्यात आला.