कोण बनणार मुंबईचा नवीन पोलीस आयुक्त?

Spread the love

कोण बनणार मुंबईचा नवीन पोलीस आयुक्त?

आयपीएस अधिकारी सदानंद दाते, संजय कुमार वर्मा, बिपिनकुमार सिंह, रितेश कुमार यांच्या नावांची चर्चा; स्पर्धेत ‘लेडी सुपरकॉप’अर्चना त्यागी यांचाही समावेश

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ३० एप्रिल रोजी निवृत्त होणार आहे. त्यांच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर मुंबईची जबाबदारी कोणाकडे जाणार याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या उत्तराधिकारीपदासाठी आयपीएस अधिकारी सदानंद दाते, संजय कुमार वर्मा, बिपिनकुमार सिंह, रितेश कुमार यांच्या नावांची चर्चा आहे. सदानंद दाते सध्या एनआयएमध्ये व्यस्त असल्याने त्यांची नियुक्ती होण्याची शक्यता कमी आहे. रितेश कुमार, अमिताभ गुप्ता आणि संजीवकुमार सिंघलही शर्यतीत आहेत. विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांचाही विचार होत असल्याची चर्चा आहे. देवेन भारती मुंबईचे स्पेशल पोलीस कमिश्नर आहेत. मुंबईच्या इतिहासात हे पद प्रथमच निर्माण करण्यात आले आहे. नवीन पोलीस आयुक्ताच्या निवडीत वरिष्ठपदाच्या विचारासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती देवेन भारती यांची ओळख आहे. यापूर्वी २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते सर्वात पॉवरफूल अधिकारी होते. परंतु सध्या देवेन भारती यांच्यासाठी विशेष पद तयार केले असल्यामुळे त्यांची नियुक्ती होण्याची शक्यता कमी आहे.

महिला अधिकारी म्हणून अर्चना त्यागी यांचे नाव चर्चेत आहे. ‘लेडी सुपरकॉप’ म्हणून १९९३ बॅचच्या अधिकारी अर्चना त्यागी यांची ओळख आहे. अर्चना त्यागी मुंबई पोलीस आयुक्ताच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. त्यांची ‘लेडी सुपरकॉप’ म्हणूनही ओळख पोलीस दलात आहे. बॉलिवूडमधील ‘मर्दानी’ हा चित्रपट त्यांच्यावरच आधारित होता. अभिनेत्री राणी मुखर्जीने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका त्या चित्रपटात साकारली होती. सध्या त्या महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्पर्धेत १९९० बॅचचे आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. ते एप्रिल २०२८ मध्ये निवृत्त होणार आहे. त्यांनी ५ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर दरम्यान राज्याचे पोलीस महासंचालक पद सांभाळले आहे. निवडणूक आयोगाने त्यांनी महासंचालक बनवले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon