लोणावळ्यात मंकी हिल पॉईंटला गुलाबी सुटकेस मध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; लोणावळा पोलिस आणि रेल्वे पोलिसांकडून तपास सुरु

Spread the love

लोणावळ्यात मंकी हिल पॉईंटला गुलाबी सुटकेस मध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; लोणावळा पोलिस आणि रेल्वे पोलिसांकडून तपास सुरु

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – लोणावळ्याजवळील मंकी हिल परिसरात मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील रुळाजवळ गुलाबी रंगाच्या सूटकेस मध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, लोणावळा पोलिस आणि रेल्वे पोलिस सखोल तपास करत आहेत. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वे मार्गावर मंकी हिल पॉइंटजवळ एका प्रवाशाला रेल्वेतून गुलाबी सूटकेस दिसली. त्याने तात्काळ रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच लोणावळा रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सूटकेस ताब्यात घेतली आणि मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने प्राथमिक तपासात हत्या की आत्महत्या याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

लोणावळा रेल्वे पोलिसांनी मृतदेह पोस्ट मॉर्टम साठी पाठवला असून, सूटकेस आणि आजूबाजूच्या परिसरातील पुरावे तपासले जात आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी या प्रकरणाचा बारकाईने तपास करत असून, आसपासच्या परिसरातील CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने हत्येचा संशय अधिक बळावला आहे. मात्र, पोस्ट मॉर्टम अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे लोणावळा आणि आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिकांमध्ये गुलाबी सूटकेस आणि या रहस्यमय मृत्यूची जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना घाबरून न जाता कुठलीही माहिती असल्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे. लोणावळा पोलिस आणि रेल्वे पोलिस या प्रकरणाला प्राधान्य देत तपास करत असून, लवकरच या घटनेचा उलगडा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon