दुसऱ्या मजल्यावरून ग्रील तुटून दोन मुलं खाली कोसळली; दोन्ही मुलं जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
उल्हासनगर – उल्हासनगरमध्ये भयंकर घटना घडली असून यात घटनेत दोन चिमुकल्यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. दोन मुलं खिडकीच्या ग्रीलमध्ये बसलेली होती. त्याचवेळी ग्रील तुटल्याने दोन लहान मुलं इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोन्ही मुलं जखमी झाली आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उल्हासनगरच्या कॅम्प ५ मध्ये ही घटना घडली. गांधी रोडवर हरे कृष्णा ही इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या ग्रीलमध्ये दोन चिमुकले बसले होते. सात वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी असे दोघे लहानगे ग्रीलमध्ये बसलेले होते. दोघं ग्रीलमध्ये बेसावध असताना अचानक खिडकीला लावलेलं ग्रील तुटून खाली कोसळलं.
महत्त्वाची बाब म्हणजे ग्रील कोसळलं त्यावेळी ते इमारतीच्या कंपाउंडला लावण्यात आलेल्या पत्र्यांवर कोसळलं. ग्रील पत्र्यांवर कोसळल्याने सुदैवाने यात मुलांचा जीव वाचला आहे. पण या घटनेत दोन्ही मुलं जखमी झाली आहेत. दोघांपैकी सात वर्षीय मुलाचे दात पडले असून त्याच्या डोक्यालाही इजा झाली आहे. तर चार वर्षीय मुलीलाही किरकोळ इजा झाली आहे. या दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीपासून काही मिनिटांवर आम्ही ऑफिसमध्ये बसलेलो. ऑफिसमध्ये बसलेलो असताना अचानक मोठा आवाज आला. आम्ही तातडीने बाहेर आलो, तेव्हा समजलं की दोन मुलं ग्रील तुटल्याने खाली पडली, ग्रील पूर्णपणे सडल्याने खिडकीला लावलेलं ग्रील तुटून खाली पडलं. पण इमारतीखाली मोठी शेड असल्याने त्यात तुटलेलं ग्रील अडकलं आणि थोडक्यात मुलांचा जीव वाचला. ग्रील तुटून इमारतीखाली असलेल्या शेडवर पडलं. ग्रीड पडल्याने शेड तुटली. ग्रील ज्या ठिकाणी पडलं त्या शेडवर मोठं भगदाड पडलं आहे. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे या शेडमुळे मुलांचा जीव वाचला आहे.