मांडवी पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचे उद्घाटन; सर्व पोलीस ठाण्यांचा कायापालट करणार – पोलीस आयुक्त मधुकर पांडे

Spread the love

मांडवी पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचे उद्घाटन; सर्व पोलीस ठाण्यांचा कायापालट करणार – पोलीस आयुक्त मधुकर पांडे

पोलीस महानगर नेटवर्क

विरार – नागरिकांच्या तक्रारींकडे पोलीस दुर्लक्ष करीत असतात असा आरोप नेहमीच होत असतो, अशातच मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणे लोकाभिमुख करून नागरिकांना अधिकाअधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले. विरार येथील मांडवी पोलीस ठाण्याच्या नव्या वास्तूचे आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी त्यांनी पोलीस ठाण्याच्या बदलत्या कार्यशैलीची माहिती दिली. पालघर जिल्हा आणि ठाणे ग्रामीण पोलिसांचे विभाजन करून १ ऑक्टोबर २०२० रोजी ‘मिरा भाईंदर वसई विरार’ पोलीस आयुक्तालय सुरू करण्यात आले आहे. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेवेळी  १३ पोलीस ठाणी होती. त्यात वाढ करून आता १९ पोलीस ठाणी तयार झाली आहेत. विरार पोलीस ठाण्याचे विभाजन करून मांडवी पोलीस ठाणे तयार करण्यात आले आहे. या पोलीस ठाण्याची नवीन इमारत तयार करून पोलीस ठाण्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या संकल्पनेतून नव्या इमारतीची निर्मिती करण्यात आली आहे. माजी आमदार राजेश पाटील यांचा आमदार निधी तसेच सामजिक दायित्व निधीतून ही वास्तू तया करण्यात आली आहे.

या वास्तूत विविध कक्ष, सभागृहाची निर्मिती करण्यात आली असून पटांगण विकसित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते या पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचे एका शानदार सोहळ्यात उद्घटान करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय शिंदे, परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त जंयत बजबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, माजी खासदार बळीराम जाधव, वसईचे प्रांताधिकारी शेखऱ घाडगे, पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

नागरिकांना पोलीस ठाण्याचे कामकाज कसे चालते त्याची माहिती चित्रफितीद्वारे या पोलीस ठाण्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाणी लोकाभिमुख व्हावी, नागरिकांना चांगली सेवा मिळावी यासाठी आमची पोलीस ठाणे प्रयत्नशील असतील असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’, या महाराष्ट्र पोलिसांच्या ब्रीद वाक्याला स्मरून आम्ही समाजातील सद्प्रवृतींचे रक्षण तसेच अपप्रवृतींवर अंकुश ठेवण्याचा सतत प्रयत्न करत आहेत, असेही पांडे यांनी सांगितले. पोलीस आयुक्तालयाचे ट्विटर खाते पुढील काही दिवसात सुरू केले जाईल असेही ते म्हणाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी या इमारतीच्या निर्मितीसाठी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon