नाशकात थरार ! अजित पवारांच्या नेत्याची हत्या, दोन सख्ख्या भावांना क्रूरपणे संपवलं
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – नाशिक शहरामध्ये खुनाचे सत्र सुरूच आहे. शहरात दोन सख्ख्या भावांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपनगर परिसरात असलेल्या आंबेडकर वाडी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. उमेश उर्फ मुन्ना जाधव आणि त्यांचे बंधू प्रशांत जाधव अशी हत्या झालेल्या दोन सख्ख्या भावांची नावं आहेत. यातील उमेश उर्फ मुन्ना जाधव राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे. या धक्कादायक घटनेने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दोघांची हत्या करून अज्ञात हल्लेखोर फरार झाले आहेत. या दोन भावांची हत्या का करण्यात आली याबाबत सध्या कुठलीही माहिती नाही. मात्र, या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीच वातावरण पसरले आहे. याप्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपासाठी नाशिक क्राईम ब्रँच सह विविध विभागातील पोलिसांची चार पथकं हल्लेखोरांच्या शोधासाठी नेमण्यात आली आहेत.
सुरुवातीला हल्लेखोरांनी गोळीबार करत हत्या केल्याची चर्चा होती. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी गोळीबार झाला नसल्याची माहिती दिली आहे. धारदार शस्त्राने वार करून या दोघा भावांची हत्या करण्यात आली आहे.एकाच कुटुंबातील दोघांची एकाच वेळी हत्या करण्यात आल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हल्लेखोरांनी दोघांचा खून का केला? नेमकी कारण काय? हल्लेखोर कोण होते? कुठून आले होते? किती जण होते? हे सर्व माहिती पोलीस तपासात समोर येणार असून पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली आहे.