पालघरमधील थरकाप उडवणारी घटना ! दाम्पत्यातील वाद विकोपाला; रागाच्या भरात दगड घेऊन पत्नीच्या डोक्यावर, छातीवर वार करत हत्या
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील थेरोंडा – धापशीपाडा येथे ही घटना घडली आहे. गुलाब सुरेश भोईर (५८)असे मृत महिलेचे नाव असून या पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपी पतीला कासा पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश रामा भोईर (५८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील थेरोंडा – धापशीपाडा येथे सुरेश रामा भोईर आणि त्याची पत्नी गुलाब सुरेश भोईर असे दांपत्य वास्तव्यास होते. दोघांचं लग्न होऊन ३५ वर्ष झालेली होती. पती आणि पत्नी दोघांनाही दारू पिण्याचे व्यसन होते. सुरेश भोईर याने त्याची पत्नी गुलाब हिला तू घरातून बाहेर का जाते? खरे सांग असे विचारले. यावरून सायंकाळी चार वाजताच्या सुमारास दोघा पती आणि पत्नीमध्ये वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की पतीने पत्नीला मारहाण केली. तिला इतकी मारहाण केली, की पत्नीचा यात मृत्यू झाला.
त्यानंतर पती सुरेश भोईर याने पत्नीला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. नंतर रागाच्या भरात दगड घेऊन पत्नीच्या डोक्यावर, छातीवर आणि पाठीवर वार केले. पतीने दगडाने डोक्यात, छातीवर वार केल्याने गंभीररीत्या पत्नी जखमी झाली. याच मारहाणीत पत्नी गुलाब भोईर हिचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात आरोपी सुरेश रामा भोईर याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १०३ (१), ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपी सुरेश भोईर याला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास कासा पोलीस करत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून महिलेच्या मृत्यूने नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.