अल्पवयीन मैत्रिणीवर प्रियकराकडून लैंगिक अत्याचार; पीडित मुलगी गर्भवती राहील्याने फुटलं बिंग. प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – पालघरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका १६ वर्षीय मुलीला मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाणं चांगलंच महागात पडलं आहे. पीडित मुलगी आपल्या प्रियकरासोबत कॉमन मैत्रिणीच्या घरी बर्थडे पार्टीला गेली होती. पण या पार्टीत आरोपी प्रियकराने पीडितेला अमली पदार्थ देऊन तिच्यासोबत भयंकर कांड केला आहे. या प्रकरणी पीडितेनं शनिवारी पालघर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २ जानेवारी २०२५ रोजी आरोपी तरुण पीडित मुलीला एका कॉमन मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला घेऊन गेला होता. याठिकाणी बर्थडे केक कापल्यानंतर आरोपीनं पीडित मुलीला केक आणि अमली पदार्थ टाकलेलं पेय प्यायला दिलं. हे पेय प्यायल्यानंतर पीडित मुलगी बेशुद्ध झाली. याचा फायदा घेऊन आरोपी पीडितेला घेऊन मैत्रिणीच्या घरात घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अलीकडेच पीडित मुलगी गर्भवती असल्याचं तिच्या लक्षात आलं. यानंतर तिने आरोपी प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली आहे. पालघर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक केली नाही. पण एका १६ वर्षीय मुलीला अशाप्रकारे वाढदिवसाच्या पार्टीला घेऊन जात अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.