व्हॉट्सअप, टेलिग्रामसारख्या समाज माध्यमांच्या समुहावरून सट्टा लावण्याचे केंद्र उद्धवस्त; तब्बल ३३ आरोपींना रंगेहात जेरबंद

Spread the love

व्हॉट्सअप, टेलिग्रामसारख्या समाज माध्यमांच्या समुहावरून सट्टा लावण्याचे केंद्र उद्धवस्त; तब्बल ३३ आरोपींना रंगेहात जेरबंद

योगेश पांडे / वार्ताहर 

अकोला – जिल्ह्यातील ग्रामीण भागात आंतरराज्य टोळीने क्रिकेट व इतर खेळावर सट्टा लावण्याचे केंद्र तयार केले होते. अकोला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अत्यंत शिताफीने छापा टाकून तब्बल ३३ आरोपींना रंगेहात जेरबंद केले. या मोठ्या कारवाईत आरोपीकडून २८.३६ लाखांचा मु्द्देमाल जप्त केला आहे. कातखेड शिवारात रवींद्र पांडे यांच्या शेतातील तीन मजली इमारतीमध्ये अवैधरित्या विनापरवाना पैशांचे ऑनलाइन खेळ खेळले जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांना मिळाली.

पोलीस अधिकारी व पथकाने सुनियोजित छापा टाकला. यावेळी ३३ आरोपी आढळून आले. संकेतस्थळ व ॲपचा वापर करून क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, कसिनोगेम, ऑनलाईन गेम आदीचा सट्टा आरोपी चालवत होते. व्हॉट्सअप, टेलिग्रामसारख्या समाज माध्यमांच्या समुहावरून त्याची जाहिरात करून ग्राहक मिळवले जात होते. ग्राहकांकडून ऑनलाइन पैसे घेऊन त्यांची आयडी तयार केली जात होती. त्यांच्या आयडीवर स‌ट्टा खेळवून जिंकलेल्या किंवा हरलेल्या पैशांची देवाण-घेवाण करण्यात येत असल्याचे आढळून आले. मालक रवींद्र पांडे याने सट्टा चालविण्यासाठी संजय गुप्ता व मोनीश गुप्ता यांना जागा उपलब्ध करून दिली होती. त्यांनी फरार आरोपी महेश डिक्कर रा. लोहारी ता. अकोट याच्या माध्यमातून आरोपींची टोळी जमवली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गुजरात राज्यातील सहा, उत्तर प्रदेश तीन, बिहार व मध्य प्रदेश राज्यातील प्रत्येकी एक महाराष्टातील चंद्रपूर, पुणे, मुंबई, अमरावती बुलढाणा येथील आठ व अकोला जिल्ह्यातील १४ आरोपींचा समावेश आहे. आरोपींकडून १२ लॅपटॉप, ११३ मोबाईल, १० बँकेचे पासबुक, दोन पासपोर्ट, १३ एटीएम कार्ड, १२ राउटर व मोडेम, जुगार खेळण्यासाठी वापरलेली सर्व साहित्य असा एकूण २८ लाख ३६ हजार २६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व आरोपींविरुद्ध बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात ६०/२०२५ कलम कलम ३१८ (४), ११२ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता सहकलम ४, ५ महा. जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व त्यांचे पथक प्रकरणाचा तपास करीत आहे. गुन्ह्यातील आरोपीपैकी मुख्य सुत्रधार कोण? याचा तपासादरम्यान शोध घेण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon