पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात ४२ केंद्रावर कॉपी; १२ वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद

Spread the love

पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात ४२ केंद्रावर कॉपी; १२ वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – राज्यातील १२ वी बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला राज्यात ४२ केंद्रांवर कॉपीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. याप्रकरणी, भरारी पथकाने नोंद घेत संबंधितांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारकडून यंदा १२ वी बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा राबवण्यासाठीचे अभियान जोमाने चालवले जात आहे. त्यासाठी, विशेष प्रयत्न केले जात असून स्वत: शिक्षण राज्यमंत्र्‍यांनी देखील मंगळवारी बुलढाण्यातली एका परीक्षा केंद्रावर धाड टाकून पाहणी केली. यावेळी, कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी सरकार गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं. मात्र, १२ वीच्या पहिल्याच पेपर दिवशी ४२ ठिकाणी कॉपी केल्याचा गैरप्रकार समोर आला आहे. त्यामध्ये सर्वाधिक कॉपीचे प्रकार हे छत्रपती संभाजी नगरमध्ये उघडकीस आले असून २६ केंद्रांवर याठिकाणी कॉपी प्रकरणाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागातून एकही गैरप्रकार समोर आलेला नाही. या विभागात कॉपीमुक्त अभियान पहिल्याच दिवशी १०० टक्के यशस्वी ठरल्याचे दिसून आले. राज्यात १२ वी परीक्षेसाठी १५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ९ विभागात असलेल्या विविध केंद्रांवर उपस्थित राहून परीक्षा दिली. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना कॉपी न करण्याचे आवाहन करत परीक्षा केंद्रावरील प्रमुखांकडून सक्त ताकीद देण्यात आली होती. त्यामुळे, कुठे दडपणात तर कुठे उत्साहात १२ वी परीक्षेचा पहिला इंग्रजी विषयाचा पेपर संपन्न झाला. मात्र, काही ठिकाणी कॉपीचा गैरप्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. राज्यात ४२ ठिकाणी कॉपीचा गैरप्रकार घडला असून सर्वाधिक २६ ही संख्या छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत. त्यामध्ये, जालन्यातली काही केंद्रावर सर्रासपणे कॉपीचा प्रकार घडत असल्याचे व्हिडिओ व फोटोही समोर आले आहेत.

१२ वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी जालना जिल्ह्यात विविध केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. जालना जिल्ह्यातल्या दोन परीक्षा केंद्रावरती कॉपी पुरवणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. येथील, एका ठिकाणी शाळेच्या कंपाउंडवर चढून कॉप्या पुरवण्यात येत होत्या, तर दुसरीकडे चक्क शाळेच्या छतावर चढून कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवण्याचे काम करत होते. संबंधित प्रकार भरारी पथकाला लक्षात आल्यानंतर मंठा शहरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातला एका विद्यार्थ्यावर रेस्टीकेटची कारवाई करण्यात आली आहे. तर, इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला या भागात काही केंद्रावरती हेच दृश्य पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon