डोंबिवलीत क्षुल्लक कारणावरून मजुराने केली सहकाऱ्याची हत्या; पोलीसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
योगेश पांडे/वार्ताहर
डोंबिवली– डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात क्षुल्लक कारणावरून एका मजुराने दुसऱ्या मजुराचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गौरव ऊर्फ चित्तमन जगत असे मृताचे नाव आहे. तर आरोपी जयसान मांझी असे मारेकऱ्यांचे नाव आहे. किरकोळ वादातून झालेले भांडण आणि रागात सहकाऱ्याच्याच हत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत एकाला अटक करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयसान मांझी आणि गौरव उर्फ चित्तमन जगत हे दोघे एका बांधकामाचा ठिकाणी एकत्र राहत होते. दोन दिवसांपूर्वी बांधकामाच्या साइटवर पडलेल्या जेवणावरुन या दोघा कामगारांमध्ये वाद झाला. कालांतराने हा वाद विकोपाला जाऊन रात्री झोपेत जगत याच्या डोक्यात आरोपी जयसान मांझी याने बांबूच्या काठीने प्रहार केला. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्यात गौरव उर्फ चित्तमन जगतचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसानी आरोपी जयसान मांझी याला अटक केली असून, पुढील तपास विष्णूनगर पोलिस करत आहेत.