माटुंगामध्ये ३०० किलो बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त; मालकावर दंडात्मक कारवाई
मुंबई – एफ-नॉर्थ वॉर्ड बीएमसी अधिकारी आणि माटुंगा ट्रॅफिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत माटुंगा चार रस्ता येथे ३०० किलो बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या जप्त करून मालकावर दंडात्मक कारवाई केली.
ही घटना दीपक फोलाने आणि पोलीस रामचंद्र लोखंडे वाहतूक व्यवस्थापन करत असताना घडली. एक टेम्पो भरधाव वेगाने सिग्नल तोडून जात होता. पोलिसांनी त्याला थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या सापडल्या, यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी त्वरित एफ-नॉर्थ वॉर्डचे वरिष्ठ निरीक्षक (परवाना विभाग) गणेश मुदाळे यांना माहिती दिली. त्यांनी आपल्या पथकासह – परवाना निरीक्षक संजय खोले, वर्षा बोरहाडे, चेउलकर आणि गजेंद्र चौहान – घटनास्थळी जाऊन या प्लास्टिक पिशव्यांची पाहणी केली. हा साठा नागपाड्यातील एका स्वीट शॉपसाठी वाहतूक केला जात असल्याचे आढळून आले.
बीएमसी अधिकाऱ्यांनी ३०० किलो बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करून मालकावर दंड आकारला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.