ठाण्यात १७,६४० कोडीनयुक्त कफसिरपच्या बाटल्यांचा साठा जप्त; पाच जणांना अटक
ठाणे – ठाणे शहर गुन्हे शाखेने भिवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोडीनयुक्त कफसिरपचा बेकायदेशीर साठा जप्त करत पाच जणांना अटक केली आहे. ओवली गावाजवळ सापळा लावून पोलिसांनी दिलीप हरिराम पाल (२८), ज्योतीप्रकाश हृदय नारायण सिंग (३७), दिनेशसिंग चेतनारायण सिंग (४५), आणि शामसुंदर रविशंकर मिश्रा (२४) यांना ४८० बाटल्यांसह रंगेहाथ पकडले. या वेळी त्यांच्याकडे असलेल्या मारुती व्हॅनचीही जप्ती करण्यात आली. तपासादरम्यान, आरोपींच्या साथीदार इकबाल साजन शेख (४०) याच्याकडे चेंबूर येथील कुंभारवाडा भागात १७,१६० बाटल्यांचा आणखी साठा आढळून आला. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण ३१.७५ लाख रुपये किमतीचा कोडीनयुक्त कफसिरप आणि १२ लाखांचा टाटा ट्रक जप्त केला आहे.
या पाचही आरोपींविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा आणि औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तपास पुढे सुरू आहे.