धक्कादायक ! बेपत्ता दोन्ही मुलींचा मृतदेह धरणाजवळ आढळला भयंकर अवस्थेत; घोटी पोलीसांकडून तपास सुरु

Spread the love

धक्कादायक ! बेपत्ता दोन्ही मुलींचा मृतदेह धरणाजवळ आढळला भयंकर अवस्थेत; घोटी पोलीसांकडून तपास सुरु

योगेश पांडे/वार्ताहर 

नाशिक – नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव परिसरातील १८ आणि १९ वर्षांच्या दोन मुली ३० जानेवारीपासून बेपत्ता होत्या. त्या नेमक्या कुठे गेल्या आणि त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? याचा काहीच थांगपत्ता पीडित मुलींच्या कुटुंबीयांना नव्हता. कुटुंबीयांनी दोन्ही मुलींचा अनेक ठिकाणी शोध घेतला. पण दोघींबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. अखेर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. दोन मुली असं अचानक गायब झाल्याने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मुलींचं अपहरण झालं असावं, असा अंदाज बांधून पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. पण पोलिसांना काहीच लीड मिळाली नाही. अखेर आता पाच दिवसानंतर दोन्ही मुलींचे मृतदेह इगतपुरी परिसरातील भाम धरणाजवळ भयंकर अवस्थेत आढळले आहेत. धरणातून पाणी सोडण्याच्या आऊटलेटच्या भागात या दोन्ही मुलींचे मृतदेह आढळले आहे. गुरुदेव गोरख गिळंदे हे सोमवारी दुपारी धरण परिसरात गेले होते. त्यावेळी त्यांना दोघींचे मृतदेह आढळले. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने घटनेची माहिती घोटी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

मनिषा भाऊ पारधी (१९) आणि सरिता काळू भगत (१८) असं मृत आढळलेल्या दोन्ही मुलींची नावं आहेत. त्या दोघीही इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव परिसरातील ठाकूरवाडी परिसरातील रहिवासी आहेत. त्या दोघीही ३० जानेवारी रोजी अचानक गायब झाल्या होत्या. आता पाच दिवसानंतर त्यांचे मृतदेह आढळले आहेत. दोन मुलींचे अशाप्रकारे मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या सोबत नक्की काय झालं, याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. पीडित मुलींनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबत काही घातपात घडला? या अँगलने पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं नेमकं कारण समोर येऊ शकतं. या घटनेची अधिक तपास घोटी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon