फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट! ‘त्या’ प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी ची स्थापना
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या प्रकरणात अटक करण्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप करण्यात आला होता. या आरोपाच्या चौकशीसाठी राज्य सरकारच्या गृहविभागानं विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. मुंबई पोलिसांच्या कायदा आणि सुव्यवस्था सह आयुक्त सत्यनारायण चौधरी या तपास पथकाचे प्रमुख असतील. त्याचबरोबर राजीव जैन, नवनाथ ढवळे,आदिक राव पोल यांचा या तपास पथकात समावेश करण्यात आला आहे. या तपास पथकाला ३० दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत.
विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. दरकेर यांनी या प्रकरणात विशेष तपास पथकाच्या स्थापनेची मागणी केली होती. ती मागणी राज्य सरकारनं मान्य केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दबाव टाकला होता. तत्कालीन पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यावर या प्रकरणाची जबाबदारी देण्यात आली होती, असा जबाव व्यापारी संजय पुनामिया यांनी दिला होता. या प्रकरणाची एक स्टिंग आपल्याकडं असल्याचा दावा पुनामिया यांनी केला होता. पुनामिया यांनी हा दावा केल्यानंतर दरेकर यांनी हा प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला होता. त्यानंतर फडणवीस सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे.