ठाण्यात संस्था चालकाचा शिक्षिकेवर वारंवार बलात्कार, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
ठाणे – राज्यात ठिकठिकाणी महिला व मुलींवर अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अंबरनाथमधील एका शाळेच्या शिक्षिकेकडे त्याच शाळेतील शिक्षकाने शरीरसुखाची मागणी केल्याने त्यांच्यामध्ये हाणामारी पहायला मिळाली. अशीच एक घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका शैक्षणिक संस्थेच्या ५४ वर्षीय संस्थापकानं महिला शिक्षिकेवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे. या आरोपावरुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. श्री नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गुलजारीलाल फडतरे यांनी सांगितले की, आरोपी रमेशचंद्र शोभनाथ मिश्रा यांना गुरुवारी रात्री ताब्यात घेण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, ४२ वर्षीय शिक्षिकेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, मिश्रा यांनी तिला नोकरी देण्यासाठी तिच्याकडून ६ लाख रुपये घेतले होते. सन २०१५ पासून मिश्रा यांच्या शिक्षण संस्थेत नोकरी सुरू ठेवण्यासाठी तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. मिश्रा यांनी तिला कायम करण्याचे आश्वासनही दिले होते. काही शिक्षकांच्या तक्रारीवरून शैक्षणिक संस्थेतील मिश्रासह चार जणांवर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर महिलेने पोलिसांना तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली, पीडित शिक्षिकेच्या तक्रारीवरुन मिश्रा यांना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलजारीलाल फडतरे यांनी दिली आहे.