शरीर सुखाच्या मागणीवरून अंबरनाथमध्ये शिक्षकांची शाळेबाहेर फ्री स्टाईल हाणामारी, अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

शरीर सुखाच्या मागणीवरून अंबरनाथमध्ये शिक्षकांची शाळेबाहेर फ्री स्टाईल हाणामारी, अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

अंबरनाथ – अंबरनाथ मधील एका शाळेत दोन शिक्षकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. शिक्षिकेने शिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. शिक्षकाने शरीरसुखाची मागणी केल्यावर हा वाद झाला. पोलीस ठाण्यात सदर वाद पोहचल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शाळेच्या परिसरात चक्क दोन शिक्षकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली असून शाळेबाहेरच महिला आणि पुरुष शिक्षकाची फ्री स्टाईल हाणामारी झाली. शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केल्याने त्याला मारहाण केल्याचा शिक्षिकेचा दावा असून याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अंबरनाथ पश्चिम येथील जावसई फुलेनगर भागात प्रियदर्शिनी हिंदी शाळा आहे. या शाळेत अनिता गुप्ता या मागील २९ वर्षांपासून शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. अनिता यांच्या पतीचं निधन झालं असून त्या घरातील एकमेव कमावत्या व्यक्ती आहेत. बुधवारी २९ जानेवारी रोजी अनिता यांनी त्यांच्या वर्गातील मुलांना पीटीच्या तासासाठी बाहेर खेळण्यासाठी सोडलं असताना, शिक्षक एकादशी राम यांनी या मुलांचा व्हिडिओ काढला. यानंतर शाळा सुटल्यावर अनिता या शाळेबाहेर पालकांशी बोलत उभ्या होत्या, तेव्हा एकादशी राम हे शिक्षक गाडीवरून तिथे आले आणि त्यांनी आपल्याला बोलावत आपल्याकडे थेट शरीरसुखाची मागणी केली, असा आरोप अनिता गुप्ता यांनी केला.

मात्र त्यांची ही मागणी ऐकून अनिता या संतापल्या, आणि त्यांनी एकादशी राम यांच्या कानशिलात लगावली. यानंतर दोन्ही शिक्षकांमध्ये शाळेबाहेरच फ्री स्टाईल हाणामारी झाली. ही हाणामारी सोडवण्यासाठी शाळेतील शिक्षिका आणि एकादशी राम यांची पुतणी असलेल्या अंजली जैस्वार आल्या आणि त्यांनीही आपल्याला शिवीगाळ केली, असा आरोप अनिता यांनी केला. इतकंच नव्हे, तर मला मागील २ वर्षांपासून त्रास दिला जात असून मी नोकरी सोडावी आणि संस्थाचालकांच्या नातेवाईकाला माझ्या जागी लावता यावं, हा त्यामागचा हेतू असल्याचं त्या म्हणाल्या. शाळेच्या मुख्याध्यापकांनी अनिता यांना दिलेली एक नोटीसही त्यांनी दाखवली असून त्यात मुख्याध्यापकांनी थेट त्यांच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केलाय. मात्र अनिता यांचे हे आरोप शिक्षिका आणि एकादशी राम यांची पुतणी अंजली जैस्वार यांनी फेटाळले आहेत. मी फक्त भांडण सोडवण्यासाठी गेली असून ते सीसीटीव्हीत दिसत असतानाही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचं त्या म्हणाल्या. अनिता गुप्ता यांनी मला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला. इतक्यावरच न थांबता अनिता गुप्ता यांच्याच चारित्र्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत एक धक्कादायक विधान केलं. मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या मारहाणीत अनिता यांच्या चेहऱ्याला आणि डोळ्याला दुखापत झाली असून त्यांच्या फिर्यादीवरून अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात शिक्षक एकादशी राम आणि अंजली जैस्वार यांच्याविरोधात विनयभंग, लैंगिक सतावणूक, दुखापत करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon