आईसोबत प्रेमसंबंध असल्याचा राग; पुण्यात अल्पवयीन मुलाने मित्रांसोबत प्रियकराला संपवलं; चारही अल्पवयीन आरोपींना अटक
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – पुणे शहरातली बिघडलेली कायदा-सुव्यवस्था हा गेल्या काही वर्षांपासून पोलीस यंत्रणेसाठी चिंतेचा विषय बनला आहे. गुरुवारी रात्री कोथरुड भागात तीन ते चार आरोपींनी एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. कोथरुड येथील आशिष गार्डन समोर हा प्रकार घडला आहे. राहुल जाधव असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव असून, या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला केलेल्या चार अल्पवयीन तरुणांपैकी एका तरुणाच्या आईचे मयत राहुल जाधवसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांना अल्पवयीन मुलाचा विरोध होता. या रागातूनच अल्पवयीन मुलाने आपल्या तीन मित्रांना सोबत घेऊन राहुल जाधववर हल्ला करत त्याला ठार मारण्याचा प्लान आखला.
गुरुवारी संध्याकाळी राहुल जाधव हा आपल्या दुचाकीवरुन सागर कॉलनी परिसरात जात होता. याचवेळी चारही अल्पवयीन आरोपींनी कोयत्याने राहुलवर हल्ला चढवला. या हल्ल्याची तीव्रता इतकी भीषण होती की राहुल जाधव रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. हल्ला केल्यानंतर चारही आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेनंतर स्थानिकांनी जखमी झालेल्या राहुल जाधवला नजिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या हल्ल्यातील चारही अल्पवयीन आरोपींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरु आहे. परंतू भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे पुणेकरांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे.