भिवंडीत ९ बांगलादेशी महिलांसह आश्रय देणाऱ्या चाळ मालकाविरोधातही गुन्हा दाखल करत अटक
योगेश पांडे/वार्ताहर
भिवंडी – मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात अवैधरित्या राहत असेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. पोलीस प्रशासनाने बांगलादेशी नागरिकांची शोधमोहीम गांभीर्याने सुरू केली होती. मागील दोन महिन्यात भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यक्षेत्रात ३० हून अधिक बांगलादेशी नागरिकांची धरपकड करण्यात आली आहे. गुरुवारी ठाकुरपाडा येथे भिवंडी गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत ९ बांगलादेशी महिलांची धरपकड केली आहे. बांगलादेशी महिलांना आसरा देणाऱ्या चाळ मालकाविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतील ठाकूर पाडा येथील नवीन मराठी शाळेच्या पाठीमागे आलेल्या दिपक गंगाराम ठाकरे यांच्या चाळीत काही बांगलादेशी राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हे बांगलादेशी नागरिक स्वतःची ओळख लपवून वास्तव्य करत होते. भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याठिकाणी कारवाई करत सिमा बेगम सिराज बेग, रेखा अनिसराम राम, रूपा अनिसराम राम उर्फ सती इक्बाल इक्चाल हुसैन अक्तर, अंजनी हबीज,शारदा बन्सी साहू, ममता शारदा साहू, पायल राजु साहू,पिंकी शारदा साहू,काजल शांत्रवन्सी साहू या नऊ महिला कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय भारताच्या सीमेत घुसखोरी करून भिवंडीत वास्तव्य करत असल्याचे आढळून आले. या सर्व महिला ठाकूर पाडा येथील ज्या चाळीत राहत होत्या त्या चाळीचे मालक दिपक गंगाराम ठाकरे अशा एकूण दहा जणांविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.