एसटी तिकीट दरवाढी विरोधात शिवसेना ठाकरे गटाचा ठाणे येथील खोपट एसटी आगारात आंदोलन

Spread the love

एसटी तिकीट दरवाढी विरोधात शिवसेना ठाकरे गटाचा ठाणे येथील खोपट एसटी आगारात आंदोलन

योगेश पांडे/वार्ताहर 

ठाणे – ईडी सरकार हाय हाय, एसटी भाडेवाढ रद्द करा…..प्रवासी उपाशी परिवहन मंत्री तुपाशी…या आशयाचे फलक हातात घेऊन ठाण्यातील उबाठा पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळावारी खोपट येथील एसटी आगारावर चक्काजम आंदोलन केले. सर्वसामान्यांच्या माथ्यावर लादलेली दरवाढ त्वरित रद्द करा तसेच परिवहन मंत्र्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून खात्याची सुधारणा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. ही दरवाढ रद्द केली नाही तर, तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी यावेळी दिला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या दरात १४.९५ टक्के भाडेवाढ लागू केल्याने राज्यभर संताप व्यक्त केला जात असतानाच, ठाण्यातील उबाठा पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खोपट एसटी आगारावर चक्काजाम आंदोलन केले. या दरवाढी विरोधात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातात घेतलेले वेगवेगळ्या आशयाचे फलक विशेष लक्ष वेधत होते.

लोकसभा, विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव रखडला होता. परिणामी, एसटीला दर महिन्याला तीन कोटींचा तोटा सहन करावा लागला असल्याचे परिवहन मंत्र्यांकडून सांगण्यात आले. परंतू, एकीकडे लाडकी बहिण योजनेच्या नावावर मते विकत घेणाऱ्या सरकारकडून ही दरवाढ म्हणजे सामान्य प्रवाशांच्या डोळ्यात धुळफेक केली जात असल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांनी केला आहे. डिझेल, चेसी, टायर यांसारख्या घटकांच्या वाढलेल्या किंमती आणि मागील काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनात झालेली वाढ यामुळे एसटी तोट्यात गेली आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या जप्त केलेल्या मालमत्तेमधून वसूल करावा अशी मागणी जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी यावेळी केली. या आंदोलनात संपर्क प्रमुख नरेश मणेरा, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, संजय तरे, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख वासुदेव भोईर, सचिन चव्हाण, प्रदीप शेडगे, वसंत गवाळे, प्रवक्ते अनिश गाढवे, संजय दळवी, महिला शहर संघटक प्रमिला भांगे, सुनंदा देशपांडे, संगीता साळवी, महेश्वरी तरे आणि विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon