सैतानी कृत्य ! गळा दाबून भिंतीवर आपटलं, बारामतीत ९ वर्षांच्या मुलाची बापानेच केली हत्या
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील होळ येथे मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने आपल्या ९ वर्षांच्या मुलाला हालहाल करून मारलं आहे. आरोपीनं पोटच्या लेकाला अभ्यास करत नाहीस, या कारणातून डोकं भिंतीवर आपटून आणि गळा दाबून हत्या केली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी परस्पर त्याचा अंत्यविधी उरकण्याचा देखील प्रयत्न केला. पण पोलिसांनी आरोपीचं बिंग फोडलं आहे. याप्रकरणी वडील विजय गणेश भंडलकर, मयत पियुषची आजी शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पियुष विजय भंडलकर असं हत्या झालेल्या नऊ वर्षीय मुलाचं नाव आहे. तर विजय भंडलकर असं आरोपी बापाचं नाव आहे. वडील विजय भंडलकर यांनी मुलगा पियुष याला तू अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो. तू तुझ्या आईच्या वळणावर जावून माझी इज्जत घालवणारा दिसतोय, असे म्हणत हाताने मारहाण केली. यानंतर राग अनावर झाला अन् त्याने पियुषचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटलं. वडिलांनी निर्दयीपणे केलेल्या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे वडील जेव्हा मुलाला मारहाण करत होते, तेव्हा पियुषची आजी हे सगळं पाहत होती, पण तिने मुलगा विजयला अडवलं नाही. उलट तिने आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पियुषच्या हत्येनंतर विजय याच्या सांगण्याप्रमाणे पियुष हा चक्कर येवून पडला आहे, अशी खोटी माहितीही आजीने दिली. १४ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता राहत्या घरी ही घटना घडल्याची माहिती आहे. विजयने मुलाची हत्या केल्यानंतर संतोष भंडलकर याने मुलाला घेऊन डॉ. भट्टड यांच्या दवाखान्यात गेला. इथं सोमनाथनं विजय याच्या सांगण्यावरून पियुष चक्कर येऊन पडला अशी खोटी माहिती दिली. डॉक्टरांनी पियुष याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मात्र आरोपींनी मुलाला तिथे नेलं नाही. उलट मयताबाबत गावातील पोलीस पाटील अथवा इतर कोणालाही काहीही न सांगत नातेवाईकांना बोलावून आरोपीने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मुलाचं शवविच्छेदन न करता थेट अत्यंविधीची तयारी केली. पण पोलिसांना खबऱ्याकडून माहिती समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पियुष याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामतीला नेला आणि त्यानंतर तपासात बापानेच पियुषची हत्या केल्याचं समोर आलं आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.