शादी डॉट कॉम या साईटवरून हेरले सावज; २५ विधवांना लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेउन लुटणाऱ्या पुण्यातील लखोबा लोखंडेला पोलीसांनी ठोकल्या बेड्या
योगेश पांडे/वार्ताहर
पुणे – तो मी नव्हेच’ या नाट्यप्रयोगाने साठ वर्षांपूर्वी राज्यातील समाजमनाला हादरवले होते. लखोबा न्यायालयात हजर होऊनही धादांत खोटं बोलला. त्यानंतर असे अनेक लखोबा समोर आले. आता लखोबांनी फसवणुकीचे आयुध तेवढी बदलली आहे. या हायटेक जमान्यात महिलांना भुरळ पाडण्यासाठी त्याने सोशल नेटवर्कचा बेमालूम वापर केला आहे. पुण्यातील एका लखोबा लोखंडने लग्नाचे आमिष दाखवून २५ हून अधिक महिलांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पुण्यातील या लखोबा लोखंडेला कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शादी डॉट कॉम या संकेतस्थळाचा त्याने सावज टिपण्यासाठी वापर केल्याचे समोर आले आहे.
लग्नाचे आमिष दाखवून तब्बल २५ हून अधिक महिलांची फसवणूक करणारा पुण्याचा लखोबा लोखंडे याला कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. फिरोज शेख असं आरोपीचं नाव आहे. शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून महिला आणि मुलींची माहिती घेत फिरोज शेख त्यांच्याशी संपर्क साधत होता.अनेक महिलांवर शारीरिक अत्याचाराबरोबरच पैसे आणि दागिने देखील उकळल्याचे समोर आले आहे. कोल्हापूरातील फसवणूक झालेल्या घटस्फोटीत महिलेच्या तक्रारीनंतर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्याच्यावर कारवाई केली. फिरोज शेख याला ताब्यात घेतल्यानंतर पंचवीस हून अधिक महिलांची फसवणूक केल्याची धक्कादायक कबुली या आरोपींनी केली. फिरोज निजाम शेख हा ३२ वर्षांचा आहे. तो मुळचा इंदापूर तालुक्यातील गंगावळण येथील रहिवाशी आहे. सध्या तो पुण्यातील कोंढवा येथे राहतो. इंदापूरमध्ये पण त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा असल्याचे तपासात समोर आले आहे. फिरोजने लग्नाचे आमिष दाखवत २५ महिलांना फसवले. त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यांच्याकडून त्याने पैसे उकळल्याचे समोर आले आहे. काही महिलांकडून तर त्याने लाखो रुपये उकळल्याची माहिती समोर येत आहे. चौकशीत त्याने २५ महिलांना गंडा घातल्याचे समोर आले.
कोल्हापूर येथील एका घटस्फोटित महिलेला फिरोज शेख याने जाळ्यात अडकवले. त्यासाठी अर्थातच त्याने शादी डॉट कॉम या साईटचा वापर केला. अनेक सावज त्याने याच साईटवरून टिपल्याचे समोर येत आहे. आपण इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्टर असल्याची थाप मारत त्याने तरुणीसह कुटुंबियांचा विश्वास संपादन केला. तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले. तिच्याकडून १ लाख ६९ हजार उकळले. तर 8 लाख २५ हजारांचे दागिने पण घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लग्नाचा विषय आला तेव्हा आपल्याला ब्रेन ट्यूमर झाल्याचा दावा त्याने केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने कोल्हापूरातील राजवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.