डोंबिवलीत मिठाईतून गुंगीचं औषध देत अल्पवयीन मुलीवर निर्घृण अत्याचार करणाऱ्या नराधमाला यूपीमधून ठोकल्या बेड्या
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – राज्यात मुली व महिलांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत आहेत. अशीच घटना काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत घडली होती. एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणी उत्तर प्रदेशातून आरोपी संदीप कुमारला अटक करण्यात आली आहे. आरोपीने मिठाईत गुंगीचे औषध देऊन मुलीवर अत्याचार केला होता. गुन्हा घडल्यानंतर तो उत्तर प्रदेशात पळून गेला होता, परंतु पोलिसांच्या शोध मोहिमेमुळे त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. उत्तर प्रदेशचे पोलीस व मानपाडा पोलीस यांनी एकत्र मिळून सापळा रचत यूपीतून आरोपीला बेड्या ठोकल्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी डोंबिवली पूर्वेतील एका वस्तीत कुटूंबासह राहते, ती भंगार गोळा करण्याचे काम करत होती. तर नराधम संदीप कुमार हाही भंगार गोळा करण्याचा व्यवसाय करून तो त्या पीडित अल्पवीयन मुलीच्या घरीच राहात होता. मात्र जानेवारी २०२२ मध्ये नराधमाची वाईट नजर त्या पीडित मुलीवर पडली होती. तेव्हापासून तो तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र पीडित मुलगी त्याला विरोध करीत होती.
अखेर नराधमाने असा साधला डाव
मात्र ऑक्टोबर २०२४ मध्ये त्या आरोपीने डाव साधला. आरोपी संदीप कुमार याने एका बहाण्याने त्या मुलीला मिठाई खायला दिली, पण त्याने त्यामध्ये गुंगीचं औषध मिसळलं होतं. ती मिठाई खाल्ल्यावर ती मुलगी बेशु्द्ध झाली आणि त्याचाच फायदा घेत आरोपी संदीपने त्या मुलीच्या घरातच तिच्यार अमानुषपणे अत्याचार केला आणि तो पसार आला. पीडित मुलीने पालकांना हे सांगितलं आणि त्यांनी मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रा दाखल केली. त्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण नराधमाला लागताच तो उत्तरप्रदेश मधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील त्याच्या मूळगावी पळून गेला होता. तेव्हापासून मानपाडा पोलीस त्याचा शोध घेत होते. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा उत्तर प्रदेश राज्यातील सिद्धार्थनगर जिल्हातील कपिलवास्तु येथील एका गावात लपला असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी युपी मधील गोरखपूर येथील एस.टी एफ पथकाला त्या नराधमाच्या गुन्ह्याची माहिती दिली. अखेर या पोलीस पथकाने ४ जानेवारी २०२५ रोजी यूपीमधील ग्राम मरवटीया कुर्मी गावाच्या हद्दीत सापळा रचून आरोपी संदीपला ताब्यात घेतले. त्यानंतर कपिलवास्तु पोलीस ठाण्यात त्याला ताब्यात घेतल्याची माहिती नोंद करून ६ जानेवारी रोजी उत्तर प्रदेश पोलिसांनी आरोपीला मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.