मुंबई पोलिसांची मोठी कारवाई;दाऊदच्या ड्रग्ज नेटवर्कला धक्का
दाऊदचा हस्तक आणि ड्रग्ज प्रकरणातील वॉन्टेड आरोपी दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकनाला अटक
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – मुंबईतील एलटी मार्ग पोलिसांनी कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि ड्रग्ज प्रकरणातील वॉन्टेड आरोपी दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकना याला अटक केली आहे. या प्रकरणात त्याचा साथीदार कादर गुलाम शेख यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दानिश चिकना डोंगरी परिसरातील दाऊद इब्राहिमच्या ड्रग्ज फॅक्टरीचे व्यवस्थापन करतो. गेल्या महिन्यात या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यातील मोहम्मद आशिकुर रहमान याला ८ नोव्हेंबर २०२४ रोजी मरीन लाइन स्टेशन परिसरातून १४४ ग्रॅम ड्रग्जसह ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी सुरू केली असून ड्रग्जचा मोठा साठा पकडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या कारवाईमुळे दाऊदच्या ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.
आशिकुर रहमानची चौकशी करताना त्याने खुलासा केला की जप्त केलेले ड्रग्ज दानिश चिकना आणि कादर गुलाम शेख यांच्याकडून विकत घेतले होते. त्याच्या कबुलीनंतर पोलिसांनी रेहान शकील अन्सारी नावाच्या आणखी एका आरोपीला अटक केली आणि दोन्ही आरोपींकडून एकूण १९९ ग्रॅम ड्रग्ज जप्त केले. गुन्ह्यातील मुख्य आरोपी दानिश चिकना आणि कादर फंता गेल्या काही दिवसांपासून वॉन्टेड होते. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी डोंगरी परिसरात सापळा रचला आणि या दोघांना अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली. दानिश चिकना याला २०१९ मध्ये डोंगरी भागातील दाऊदच्या ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणात राजस्थानमधून अटक करण्यात आली होती. त्या वेळी एनसीबीने या फॅक्टरीचा पर्दाफाश केला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा ड्रग्ज व्यवसाय सुरू केल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आहे.