पंतनगर मोबाइल मिसिंग पथकाचे स्तुत्य कार्य, हरवलेला मोबाइल काही तासात सापडला
रवि निषाद/प्रतिनिधि
मुंबई – घाटकोपर पंतनगर पोलिस हद्दीतील एका युवतीचा हरवलेला आय फोन १२ हा मोबाइल काही तासांत सापडला असून तो प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या आदेशाने पीडित युवतीला परत केल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन डिसेंबर रोजी पंतनगर पोलीस हद्दीत राहणाऱ्या एका युवतीचा आय फोन १२ हा मोबाइल बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आहवाड यांनी पंतनगर पोलीस ठाणे येथील मोबाइल हरवलेल्या पथकाचे हेड कॉन्स्टेबल संतोष गीध यांना या प्रकरणाचा तपास सोपवला. पोलीस हवालदार संतोष गीध या प्रकरणाचा तपास करत पीडित युवतीचा मोबाइल ट्रेस करून तो तीन डिसेंबर रोजी जप्त केला. महिला पोलीस उपनिरीक्षक मैना चट आणि दिवसपाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक अहिरे यांच्या उपस्थितीत पोलीस हवालदार संतोष गीध यांनी पीडित युवतीला तो आय फोन १२ हा मोबाइल परत करून दिल्याने पीडितेने संबंधित सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.