बुलढाणा तालुक्यातील धाड गावात दंगल; मिरवणुकीत फटाके फोडल्यावरून वाद

Spread the love

बुलढाणा तालुक्यातील धाड गावात दंगल; मिरवणुकीत फटाके फोडल्यावरून वाद

योगेश पांडे/वार्ताहर 

बुलढाणा – बुलढाणा तालुक्यातील संवेदनशील स्थळ म्हणून ओळख असलेल्या धाड गावात शनिवारी रात्री उशिरा दंगल उसळली. क्षुल्लक कारणावरून दोन भिन्न धर्मीय गट एकमेकांमोर उभे ठाकल्यावर घोषणाबाजी करीत दगडफेक करण्यात आली. या संघर्षात काही जण जखमी झाले असून वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याचे वृत्त आहे. यामुळे धाड नगरीत सध्या तणावपूर्ण परिस्थिती असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शनिवार, ३० नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा हा घटनाक्रम घडला. टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त गावात मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी शांततेत चाललेल्या या मिरवणुकीदरम्यान फटाके उडवण्यावरून दोन गटांत वाद पेटला. शाब्दिक खडाजंगी झाल्यावर धक्काबुक्की झाली. याचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. पाहतापहाता दोन्ही भिन्न धर्मीय गटाकडून तुफानी दगडफेक करण्यात आली.

मिरवणूक काढताना फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आणि वाद उफाळून आला. दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले, प्रचंड राडा झाला. दोन्ही गटात दगडफेक करण्यात आली. वाहनांची जाळपोळ देखील करण्यात आली आहे. यामुळे काही वेळेतच जातीय दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. ही दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना पोलीस दल घटनास्थळी पोहोचले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे आणि जमावाला पांगवण्याचे प्रयत्न पोलिसांनी केले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी अतिरिक्त पोलीस कुमकसह धाडमध्ये डेरेदाखल झाले. दंगल घटनास्थळ, मुख्य चौकात आणि संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यामुळे आज गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचे चित्र आहे. अनेक खेडेगावांशी जुळलेले धाड हे गाव मोठी बाजारपेठ आहे. मात्र आज बहुतेक दुकाने बंदन असून रस्त्यावर शुकशुकाट आहे. वाहतूक देखील मंदावल्याचे दिसून आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात तळ ठोकून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon