प्रवाशावर हिंदीतून बोलण्याची जबरदस्ती, तिकीट क्लर्कविरोधात संताप
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – हिंदीत बोला नाहीतर तिकीट नाही, असं म्हणणाऱ्या तिकीट क्लार्कसोबत प्रवाशाच्या वादाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन तिकीट क्लार्क विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. मराठीत बोलल्यावर तिकीट नाही? महाराष्ट्रात मध्य रेल्वेची बळजबरी का? असा जाब मराठी एकीकरण समिती या एक्स हँडरवरुन याबाबत जाब विचारण्यात आला आहे. नाहूर रेल्वे स्टेशनमधील हा व्हिडीओ असल्याचं बोललं जात आहे. व्हिडीओत दिसत आहे की, तिकीट क्लार्क आणि एका प्रवाशांमध्ये वाद सुरु आहे. प्रवाशाने क्लार्ककडे तिकीट मागितले. मात्र मराठीत नाहीतर हिंदीत बोला असं क्लार्कने उद्धटपणे म्हटलं. मात्र क्लार्कने हिंदीचा आग्रह धरल्याचा राग प्रवाशाला आला आणि त्याने याबाबत जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळी हिंदीत बोला नाहीतर तिकीट मिळणार नाही असं क्लार्कने म्हटल्याचा आरोपही प्रवाशाने केला आहे.
मात्र प्रवाशानेही मराठी बाणा दाखवत क्लार्कला मराठी भाषेतच बोलण्यास सांगितलं. मात्र क्लार्कने मला मराठी येत नाही हिंदीतचं बोला, हे तुणतुणं सुरु ठेवलं. इथे राहायचं असेल तर मराठीत बोलावच लागेल, असा सज्जड दम देखील प्रवाशाने क्लार्कला दिला. अखेर लोकांनी मध्यस्थी करुन हा वाद मिटवला. मात्र या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मराठी एकीकरण समितीने ट्वीट करत मध्य रेल्वेला याबाबत विचारणा केली आहे. ट्वीटमध्ये म्हटलं की, “‘मराठी’ बोललात तर, महाराष्ट्रात रेल्वेची सेवा मिळणार नाही? हिंदी’ मे बोलो, मराठी नही. मराठी बोलल्यावर तिकीट नाही? महाराष्ट्रात मध्य रेल्वेची बळजबरी? रेल्वेकडून पुन्हा ‘मराठी’ महाराष्ट्राची गळचेपी, मराठी राज्यात मराठीत सेवा का नाही?”